जात पडताळणी प्रमाणपत्र आता आठवडे बाजारात; राज्यभरात गावोगावी विशेष शिबिर

पुणे -जात पडताळणी प्रमाणपत्र जलद गतीने उपलब्ध करुन देण्यासाठी राज्यातील आठवडे बाजारात शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. हा अभिनव उपक्रम राबविण्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत (बार्टी) शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. समाज कल्याण आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर ओमप्रकाश बकोरिया यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेस भेट देऊन कामकाज आढावा घेतला. यावेळी बार्टीचे महासंचालक सुनिल वारे, विभागप्रमुख डॉ. सत्येंद्रनाथ चव्हाण, स्नेहल भोसले, अनिल कारंडे, आरती भोसले, रवींद्र कदम, वृषाली शिंदे यांच्यासह बार्टी संस्थेतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
राज्यातील मागासवर्गीय नागरिकांना शिक्षण, नोकरी, निवडणुका यासाठी जात पडताळणी प्रमाणपत्राची आवश्यकता भासत असते. जात पडताळणी प्रमाणपत्र सहजासहजी मिळत नाही. पण, आता त्यांना या मोहिमेने दिलासा मिळणार आहे. समाज कल्याण आयुक्तांच्या निर्देशानुसार जात पडताळणी प्रमाणपत्र जलद गतीने मिळण्यासाठी आठवडे बाजारात शिबिरांचे आयोजन करण्यात येईल व जात पडताळणीची कामे निकाली काढण्यात येतील, असे सुनील वारे यांनी स्पष्ट केले आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षांच्या तयारीसाठी तसेच कौशल्य विभागामार्फत दर्जेदार प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यात येत आहे. “बार्टी’ संस्थेचे कार्य प्रेरणादायी आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर समाजकल्याण व बार्टी एकत्रित काम करतील. – ओमप्रकाश बकोरिया, आयुक्त, समाजकल्याण





