सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील माढा आणि मोहोळ तालुक्यांतील अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी आज राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दौरा केला. मात्र, या दौऱ्यात त्यांना पूरग्रस्त आणि शेतकऱ्यांच्या तीव्र संतापाला सामोरे जावे लागले. “सगळं पोहोचलंय, असं तलाठी म्हणतात; पण आम्हाला एक बिस्कीटचा पुडासुद्धा मिळाला नाही,” असा आक्रोश वडवळ गावातील काळे वस्तीतील शेतकऱ्यांनी व्यक्त केला. कृषिमंत्री भरणे यांनी माढा तालुक्यातील उंदरगाव आणि पासलेवाडी येथे पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी जेवण आणि प्राण्यांसाठी चाऱ्याची कमतरता असल्याची तक्रार मांडली. यावर तातडीने कारवाई करत मंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना फोनवरून सुनावले आणि लोकांच्या जेवणासह प्राण्यांसाठी चाऱ्याची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले. “शेतकऱ्यांवर आलेले हे मोठे संकट आहे, याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे. बँकांनी कर्जवसुलीसाठी तगादा लावू नये, यासाठीही सूचना दिल्या जातील,” असे भरणे यांनी सांगितले. तसेच, नुकसानग्रस्त भागात तातडीने ५,००० रुपये आणि इतर मदत पोहोचवली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. मात्र, प्रत्यक्षात मदत पोहोचली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पाहायला मिळाली. मोहोळ तालुक्यातील वडवळ गावात मंत्र्यांचा ताफा शेतकऱ्यांनी अडवला. “माझ्या घरावर २० फूट पाणी आहे, मला एक बिस्कीटचा पुडासुद्धा मिळाला नाही,” अशी व्यथा मांडली. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी “गेल्या तीन दिवसांपासून अन्नधान्य पोहोचवत आहोत,” असा दावा केला. यावर संताप व्यक्त करत नागरिकांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला, “तुम्ही म्हणता सगळं पोहोचलंय, काय XX पोहोचलंय?” पासलेवाडी येथे पाहणी दरम्यान एका शेतकऱ्याला आपली व्यथा मांडताना हुंदका अनावर झाला. तेव्हा मंत्र्यांनी त्याला जवळ घेत, “काळजी करू नका, सरकार तुमच्या पाठीशी आहे,” असा दिलासा दिला. दरम्यान, सीना-कोळेगाव धारणातून अनियंत्रित पाण्याचा विसर्ग झाल्याने नुकसान झाल्याचा मुद्दा उपस्थित झाला. याबाबत भविष्यात चौकशी समिती नेमून दोषींवर कारवाई केली जाईल, असे भरणे यांनी स्पष्ट केले. कृषिमंत्र्यांनी प्रत्येक गावात जाऊन पंचनामे करण्याचे आदेश दिले असले, तरी अद्याप मदत केवळ घोषणांपुरतीच मर्यादित असल्याचे चित्र आहे. पूरग्रस्त आणि शेतकऱ्यांच्या संतापाने प्रशासन आणि सरकारच्या दाव्यांवरील विश्वासाला तडा गेल्याचे दिसून येत आहे.