Caste Controversy in parliament: संसदेत ‘जाती’वरून गदारोळ; बॅनरबाजी, घोषणाबाजी अन् पत्रकेही फाडली

Caste Controversy in parliament: – विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची जात विचारल्याच्या मुद्द्यावरून बुधवारी लोकसभेत प्रचंड गदारोळ झाला. काँग्रेससह विरोधी पक्षांच्या सदस्यांनी व्यासपीठासमोर येऊन घोषणाबाजी केली. पत्रके फाडली, त्यानंतर सभापती ओम बिर्ला यांना सभागृहाचे कामकाज अर्ध्या तासासाठी तहकूब करावे लागले.
अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधींबाबत केलेल्या वक्तव्याचा सत्ताधारी पक्षाने जोरदार बचाव केला. विरोधकांच्या गदारोळात संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी काँग्रेसवर अराजकता भडकवल्याचा आरोप केला.
विरोधकांचा सभागृहात गोंधळ, पोस्टरबाजी –
लोकसभेचे कामकाज सकाळी सुरू होताच विरोधी सदस्यांनी घोषणाबाजी सुरू केली. विरोधकांचा गदारोळ होऊनही सभापतींनी प्रश्नोत्तराच्या तासाचे कामकाज सुरूच ठेवले. या काळात राहुल गांधी सभागृहात नव्हते. काँग्रेसचे सदस्य गौरव गोगोई यांच्यासह अनेक विरोधी सदस्यांनी ‘वुई वॉन्ट कास्ट सेन्सस’चे पोस्टर हातात घेतले होते.
ओम बिर्ला म्हणाले, ‘कोणताही सदस्य फलक घेऊन सभागृहात येणार नाही, हे आधीच ठरले आहे. तरीही पोस्टर दाखवले जात आहेत. सभापतींनी नकार दिल्यानंतरही गदारोळ कमी झाला नाही.
संसदीय कामकाज मंत्री नारेबाजी करणाऱ्या विरोधी सदस्यांना म्हणाले की, राहुल गांधी स्वतः दिवसभर जात – जात करत असतात, पण त्यांना कोणी जात विचारले तर गोंधळ होतो.
दरम्यान, लोकसभेतील भाजप सदस्य अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधी यांचे नाव न घेता म्हटले होते की, ज्यांची जात माहित नाही ते जात गणनेबद्दल बोलतात. अनुराग ठाकुर यांच्या या वक्तव्यामुळे विरोधक संतप्त झाले आहेत. (Caste Controversy in parliament)





