नवी दिल्ली : दिल्लीचे माजी मंत्री आणि आपचे नेते सत्येंद्र जैन यांच्या विरोधात मनी लॉण्डरिंग प्रकरणी खटला चालवला जाणार आहे. त्यासाठी आवश्यक मंजुरी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिल्याची माहिती सुत्रांनी दिली. जैन सर्वप्रथम १.४७ कोटी रूपयांची बेहिशेबी संपत्ती जमवल्याच्या आरोपावरून सीबीआयच्या रडारवर आले. त्याप्रकरणी त्यांच्या विरोधात ऑगस्ट २०१७ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. त्या घडामोडीची दखल घेऊन ईडीने मनी लॉण्डरिंगचा तपास सुरू केला. त्या केंद्रीय यंत्रणेने हवाला व्यवहारांच्या आरोपावरून जैन यांच्या विरोधात स्वतंत्र गुन्हा दाखल केला. तसेच, त्यांना मे २०२२ मध्ये अटक केली. ते सध्या जामिनावर बाहेर आहेत. नुकतेच ६० वर्षीय जैन यांच्या विरोधात खटला चालवण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने राष्ट्रपतींना साकडे घातले. भारतीय नागरिक सुरक्षा संहितेतील कलम २१८ अंतर्गत मंजुरी देण्याची विनंती राष्ट्रपतींनी मान्य केली. जैन यांच्या विरोधात पुरेसा पुरावा असल्याचे गृह मंत्रालयाने म्हटले आहे. आता जैन यांच्या विरोधात ईडीकडून पुरवणी आरोपपत्र दाखल केले जाण्याची शक्यता आहे.