शिरूर तालुक्यातील विनयभंग प्रकरण; पीडितेची पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षकांकडे धाव

निमोणे- शिरूर तालुक्यातील करडे गावात रेशन दुकानात रेशन घेण्यास गेलेल्या २८ वर्षीय अल्पसंख्याक महिलेचा विनयभंग करून जीवे मारण्याची धमकी देण्याचा गंभीर प्रकार घडला. पीडितेने शिरूर पोलिस ठाण्यात दुकानदाराविरुद्ध तक्रार दाखल केली. मात्र, तक्रारीनंतर गावातील काही राजकीय व्यक्तींनी तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकला. पीडिता ठाम राहिल्याने १५ जुलै रोजी आरोपीच्या मुलाने आणि १६ जुलै रोजी गावातील एका गावगुंडाने शिरूर-बायपास रस्त्यावर गाडी आडवून जीवे मारण्याची धमकी दिली.
या घटनांची शिरूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली, तरी आरोपीच्या नातेवाइकांकडून पीडितेला त्रास देण्याचे सत्र सुरूच आहे. अखेर २१ जुलै रोजी पीडितेने पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीप सिंग गिल यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली आणि जीवाला धोक्याची तक्रार नोंदवली. गिल यांनी शिरूर पोलिसांना खडसावत पीडितेला तातडीने मदत करण्याचे आदेश दिले. दरम्यान, रेशन दुकानातील सीसीटीव्ही फुटेज गायब झाल्याने पुरावा नष्ट करण्याचा आरोप पीडितेने केला आहे. शिरूर पोलिसांचा निष्क्रियपणा पुन्हा चर्चेत आला आहे.





