शेख हसीना यांच्याविरोधात 2013 मधील ‘त्या’ सामूहिक हत्याकांडाविरोधात गुन्हा दाखल

ढाका : शेख हसीना यांच्याविरोधात आता २०१३ साली झालल्या सामूहिक हत्याकांडाच प्रकरण दाखल करण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला गेला आहे. हसीना यांच्याशिवाय अन्य ३३ जणांवर सामूहिक हत्येचा आरोप करण्यात आला आहे. २०१३ साली हेफाजत-ए-इस्लामने आयोजित केलेल्या रॅलीवर बेछुट गोळीबार करण्यात आला होता.
दिनांक ५ मे २०१३ रोजी मोतीझील येथील शापला छत्तर या ठिकाणी ही घटना घडली होती. या प्रकरणी बांगलादेशी पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बाबुल सरदार चाखरी यांनी ढाक्याच्या महानगर दंडाधिकाऱ्यांकडे अर्ज केला आहे. न्यायालयाने अर्जदारांचे निवेदन दाखल करून घेतले असून पुढील कार्यवाही नंतर केली जाईल, असे म्हटले आहे.
पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर शेख हसीना यांच्याविरोधात आता ११ प्रकरणे दाखल झाली आहेत. त्यातील ८ प्रकरणे हत्येशी संबंधित आहेत.तर अपहरणाशी संबंधित एक प्रकरण आणि मानवतेविरोधातील गुन्हे आणि वांशिक हत्याकांडाशी संबंधित दोन प्रकरणे आहेत. दरम्यान १५ जुलै ते ५ ऑगस्ट दरम्यानच्या आंदोलनामध्ये झालेल्या वांशिक हत्या आणि मानवतेविरोधातील गुन्ह्यांच्या प्रकरणी बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय गुन्हे लवादाने बुधवारपासून तपासाला सुरुवात केली आहे.





