Satara Accident : पसरणी घाटात कार दरीत कोसळून भीषण अपघात; दोघांचा मृत्यू

वाई : वाईमधील पसरणी घाटात कार दरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. ही कार सुमारे २०० फूट दरीत कोसळली. या भीषण अपघातात चार जण गंभीर जखमी झाले. यातील दोघांचा मृत्यू झाला आहे तर बाकी दोघांवर उपचार सुरु आहेत. हे सर्वजण लोणी काळभोर येथील रहिवासी आहेत.दोन दिवसांपूर्वी हे सर्वजण कोकणात फिरण्यासाठी गेले होते. महाबळेश्वर पाचगणी वाईमार्गे पुण्याला जात असताना सायंकाळी पाचच्या सुमारास हा अपघात झाला.
काय घडले नेमके?
पसरणी घाटात बुवासाहेब मंदिरापासून शंभर मीटर अंतरावर मोटार क्र( एम एच१२ क्यूटी ७७११) खोल दरीत कोसळली. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने व घाट उताराचा अंदाज न आल्याने कार खोल दरीत कोसळली आणि हा अपघात झाला. यामध्ये बजरंग पर्वत काळभोर,वैभव काळभोर,सौरभ जालिंदर काळभोर अक्षय मस्कु काळभोर (सर्वजण लोणी काळभोर, पुणे) हे गंभीर जखमी झाले. त्यांना वाई येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी तातडीने दाखल करण्यात आले. मात्र यामधील दोघांचा मृत्यू झाला तर बाकी दोघांवर उपचार सुरु आहेत.
या अपघाताची माहिती मिळताच सिद्धनाथवाडी वाई येथील शिव सह्याद्री रेस्क्यू टीमच्या कार्यकर्त्यांनी व वाई पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यानंतर जखमींना खोल दरीतून दोरखंडाच्या साह्याने बाहेर काढण्यात आले. या अपघातानंतर घाटामध्ये बघ्यांची मोठी गर्दी झाल्याने अनेक वाहने रस्त्यावरच उभी राहिली. त्यामुळे घाटात मोठ्या प्रमाणात ट्राफिक जाम झाले होते.





