पुणे | कॅन्टोन्मेंट बोर्ड विलीनीकरण रखडले

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – महापालिका हद्दीतील खडकी आणि पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या समावेशला ब्रेक लागला आहे. या दोन्ही बोर्डाच्या समावेशनाची कार्यपध्दती केंद्रशासनाने जाहीर केली होती. मात्र, या बोर्डांच्या हद्दीतील मिळकती आणि जागांची मालकीचा वाद निर्माण झाल्याने ही प्रक्रिया रखडल्याचे सांगण्यात येत आहे.
महापालिकेकडून हे दोन्ही बोर्ड ताब्यात घेताना ता ठिकाणी असलेल्या जागांच्या मालकी महापालिकेची राहिल अशी मागणी केली आहे. मागील महिन्यात बोर्डाच्या हस्तांतरणाबाबत महापालिकेस सूचना करण्यात आल्या होत्या.
त्यानुसार महापालिकेत पालिका अधिकारी, बोर्डाचे अधिकारी तसेच जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली होती. त्यानुसार कोणत्या विभागाने कशाचा ताबा घ्यायचा यावर निर्णय झाला तसेच संबधित विभागांना महापालिकेने सूचना केल्या.
ही प्रक्रिया सुरू असतानाच राज्याच्या नगरविकास विभागाने महापालिकेच्या अधिकाऱ्यांची आॅनलाइन बैठक घेतली या बैठकीत महापालिकेकडून जागेच्या मालकीचा प्रश्न उपस्थित करण्यात आला.
नागरी सुविधा द्यायच्या असतील तर सध्याची रुग्णालये, उद्याने, अॅमिनिटी स्पेस, मार्केट तसेच इतर नागरी प्रकल्प महापालिकेस मालकी हक्काने मिळावेत अशी मागणी करण्यात आलेली होती.
त्यानंतर राज्यशासनाने याबाबत संरक्षण विभागालाही कळविले आहे. मात्र, त्यावर अद्याप कोणताही निर्णय न झाल्याने बोर्डाचे विलीनीकरण लांबणीवर पडले आहे. या दोन्ही बोर्डाच्या समावेशनांतर महापालिकेची हद्द दीड हजार चौरस किलोमीटरने वाढणार आहे. तसेच लोकसंख्येत ८० ते ९० हजारांची भर पडणार आहे.





