Beed Crime : बीडमध्ये शेतात गांजाची लागवड; २२ किलो गांज्यासह महिला अटकेत
ही महिला गेल्या किती दिवसांपासून हा व्यवसाय करत होती आणि यामागे कोणते मोठे रॅकेट सक्रिय आहे का, याचा तपास आता पोलीस करत आहेत.

Beed Crime – बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील लोणवळ गावात पोलिसांनी एका शेतावर धाड टाकून गांजाची अवैध शेती उद्ध्वस्त केली आहे. या कारवाईत सुमारे २१ किलो ९६० ग्रॅम वजनाचा ओला गांजा जप्त करण्यात आला असून, याप्रकरणी शेतमालक महिलेला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. जप्त केलेल्या गांजाची बाजारपेठेत किंमत सुमारे ५.४९ लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वडवणी तालुक्यातील लोणवळ येथील एका शेतात व्यावसायिक फायद्यासाठी गांजाच्या झाडांची छुप्या पद्धतीने लागवड करण्यात आल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे बुधवारी पोलीस पथकाने संबंधित शेतात छापा टाकला.
यावेळी शेतात कपाशी किंवा इतर पिकांच्या आड गांजाची झाडे लावली असल्याचे दिसून आले. पोलिसांनी तात्काळ ही सर्व झाडे उपटून काढली आणि २२ किलोच्या आसपास मुद्देमाल ताब्यात घेतला.
याप्रकरणी शेतमालक आशाबाई शिंगारे (वय ४३ वर्ष) हिला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी महिलेविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही महिला गेल्या किती दिवसांपासून हा व्यवसाय करत होती आणि यामागे कोणते मोठे रॅकेट सक्रिय आहे का, याचा तपास आता पोलीस करत आहेत.






