शेतकऱ्यांचा उद्या देशभरात कँडल मार्च; डल्लेवाल यांच्या उपोषणाला पाठिंबा

चंदिगढ – पंजाबमधील शेतकरी नेते जगजितसिंग डल्लेवाल २७ दिवसांपासून बेमुदत उपोषण करत आहेत. त्यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शवण्यासाठी शेतकरी २४ डिसेंबरला देशभरात कँडल मार्च काढणार आहेत.
शेतमालाला किमान आधारभूत किमतीची (एमएसपी) कायदेशीर हमी मिळावी, या प्रमुख मागणीसाठी शेतकरी फेब्रुवारीपासून पंजाब-हरियाणा सीमेवर आंदोलन करत आहेत. त्या सीमेवरील खनौरी भागात ७० वर्षीय डल्लेवाल यांनी २६ नोव्हेंबरपासून उपोषण सुरू केले.
त्यांची प्रकृती चिंताजनक बनली आहे. आता त्यांच्या समर्थनार्थ देशाच्या इतर भागांतील शेतकरीही सरसावले आहेत. डल्लेवाल यांच्या उपोषणाला २६ डिसेंबर यादिवशी एक महिन्याचा कालावधी पूर्ण होईल.
त्यादिवशी तालुका आणि जिल्हा स्तरांवर प्रतिकात्मक उपोषण करण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे. केंद्र सरकारने मागणी मान्य करावी, असे आवाहनही शेतकऱ्यांकडून करण्यात आले आहे.
स्वत: डल्लेवाल यांनीही नुकतेच सर्वोच्च न्यायालयाला एक पत्र पाठवले. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्याचा आदेश सरकारला द्यावा, अशी विनंती त्या पत्रातून करण्यात आली.





