सातारा लाेकसभेची उमेदवारी अमित कदम यांना द्यावी

सातारा – राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष अमित कदम यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सातारा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी, अशी मागणी सातारा जावळीच्या जनतेसह राष्ट्रवादी काँग्रेसचे जावळी तालुकाध्यक्ष साधू चिकणे व सातारा तालुकाध्यक्ष शशिकांत वाईकर यांनी पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्याकडे केली आहे.
याबाबत प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, राष्ट्रवादी कॉंग्रेसची स्थापना १९९९ मध्ये झाली, तेव्हापासून सातारा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असून तो अबाधित राखण्याचे काम मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले आहे. यावेळी लोकसभा निवडणूक महायुतीच्या माध्यमातून होणार आहे. त्यामुळे या परंपरागत जागेची उमेदवारी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून अमित कदम यांना मिळावी, अशी मागणी चिकणे व वाइकर यांनी केली आहे. जावळी तालुक्यातील नेते, जिल्हा परिषदेच्या अर्थ आणि शिक्षण समितीचे माजी सभापती, महाबळेश्वरचे माजी सभापती म्हणून यशस्वी जबाबदारी पेललेल्या अमित कदम यांचा संपर्क चांगला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अमित कदम विश्वासू सहकारी असून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून सध्या काम पाहत आहेत.
त्यांचे वडील माजी आमदार कै. जी. जी. कदम यांचा राजकीय आणि वैचारिक वारसा अमित कदम यांना लाभला असून महाबळेश्वर पंचायत समितीचे सभापती व जिल्हा परिषदेच्या शिक्षण आणि अर्थ समितीचे सभापती म्हणून अमित कदम यांनी उठावदार काम केले आहे. जिल्ह्यात त्यांचा दांडगा जनसंपर्क असून त्यामुळेच सातारा मतदारसंघातील जनतेने अमित कदम यांच्या उमेदवाराची मागणी लावून धरली आहे. याबाबत जिल्ह्यातील नेते, पदाधिकारी अजित पवार यांची भेट घेऊन अमित कदम यांच्या उमेदवारीची मागणी करणार आहेत.
===============





