Pune District : तळेगाव गटात उमेदवारीचा पेच कायम

तळेगाव ढमढेरे : आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरूर तालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले आणि राजकीय दृष्ट्या प्रभावशाली ठरलेले तळेगाव ढमढेरे गाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. या गावात सर्वच प्रमुख राजकीय पक्षांचे (भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही गट, काँग्रेस, शिवसेना दोन्ही गट, मनसे, आरपीआय, बसप) पदाधिकारी, कार्यकर्ते आणि माजी सदस्य आहेत. तरीदेखील यंदा गावातून एकही उमेदवार जिल्हा परिषद निवडणुकीसाठी पुढे येत नाही, हे अनेकांना आश्चर्यकारक वाटत आहे.
या पार्श्वभूमीवर गावातील मुळोबा मंदिर राजकीय बैठकींचे केंद्रबिंदू बनले आहे. गावातील स्थानिक स्वराज्य संस्थेतील ग्रामपंचायत, सोसायटी निवडणुकांच्या अनेक यशस्वी बैठका या मंदिरातून पार पडल्या. त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज होणारी ‘एक गाव एक उमेदवार’ बैठक गावाला फलदायी ठरेल, असा आशावाद ग्रामस्थांना आहे. आरक्षण जाहीर झाल्यापासून गावातील कार्यकर्ते, पदाधिकारी आणि ज्येष्ठ ग्रामस्थ येथे चर्चेसाठी एकत्र येऊ लागले आहेत. प्रत्येक पक्ष आपापली रणनीती ठरवत असला तरी गावातील राजकीय संतुलन बिघडू नये म्हणून सर्वजण सावध पवित्रा घेत आहेत.
गावातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी व ज्येष्ठांनी ‘एक गाव, एक उमेदवार’ या भूमिकेवर ठाम राहण्याचे सुचविले आहे, जेणेकरून तळेगाव ढमढेरेच्या मतविभाजनामुळे बाहेरील उमेदवाराला फायदा होऊ नये. परंतु, या सूत्रावर सर्वच गटांची एकमतता साधणे कठीण ठरत आहे. दरम्यान, गावातील तरुण कार्यकर्ते मात्र स्थानिक प्रतिनिधित्वावर ठाम आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, “तळेगाव ढमढेरेसारख्या मोठ्या गावाला जिल्हा परिषदेत आवाज असायलाच हवा. आपला उमेदवार उभा राहिला पाहिजे.” तळेगाव ढमढेरेचे राजकीय चित्र नेहमीच शिरूर तालुक्यात निर्णायक राहिले आहे. आमदारकी, जिल्हा परिषद, पंचायत समितीचे अनेक निर्णय तळेगावकरांच्या निर्णयाने ठरलेले आहेत. त्यामुळे आज होणाऱ्या या बैठकीकडे गटासह संपूर्ण तालुक्याचे लक्ष वेधले गेले आहे.
पदाधिकाऱ्यांचे गाव पण एकीचा अभाव!
शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे हे असे एकमेव गाव आहे जिथे सर्व प्रमुख राजकीय पक्षांचे पदाधिकारी आहेत. मात्र, स्थानिक पातळीवरील मतभेद आणि गटबाजी न संपल्याने गावात एकीचा अभाव स्पष्टपणे जाणवतो. परिणामी, आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत कोणत्याही पक्षाला ठोस पकड मिळवणे कठीण झाले आहे. तळेगाव ढमढेरेत अनेक पक्षाचे मुख्य पदाधिकारी असल्याने कसल्याही परिस्थितीत आपल्या पक्षाची उमेदवारी मिळवून निवडणून आणून गट राखणे गरजेचे आहे.
पक्षासाठी रणनीती आवश्यक
तळेगाव ढमढेरेत अनेक पक्ष सक्रिय असल्याने राजकीय स्पर्धा तीव्र आहे. येथील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसाठी जोखीम मोठी असून, सक्षम उमेदवाराची निवड करणे आणि निवडून आणून पक्षाची जबाबदारी पार पाडणे हे जिकिरीचे झाले आहे. अशातच ‘एक गाव, एक उमेदवार’ ही संकल्पना पदाधिकाऱ्यांसाठी महत्त्वाचा टप्पा आहे.
गावाच्या विरोधात जाणाऱ्याला संधी नाही – नरके
तळेगावात “एक गाव एक उमेदवार” या संकल्पनेला गावकऱ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असून गावातील एकजूट मजबूत होत आहे. या पार्श्वभूमीवर नुकतीच तळेगाव ढमढेरे येथे गावातील सर्वपक्षीय नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत पुणे जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब नरके यांनी गावाच्या एकमताने घेतलेल्या निर्णयाविरोधात जाणाऱ्याला भविष्यात कोणत्याही निवडणुकीत किंवा पदावर संधी दिली जाणार नाही, असा इशारा दिला. गावाच्या हितासाठी सर्वांनी एकत्र राहावे आणि मतभेदाऐवजी सामंजस्यातून एक उमेदवार द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.





