Lok Sabha Election 2024 : “कुटुंबीयांसाठी उमेदवारी मागितली नाही” – छगन भुजबळ

नाशिक – महायुतीमध्ये अनेक जागांवर एकमत झाले आहे. नाशिकच्या जागेबाबत देखील चर्चा सुरू आहे. काही इच्छुक मुंबईला देखील जाऊन भेटून आले आहेत. नाशिकची जागा राष्ट्रवादी काँग्रेसने लढवली तर काय होईल? याचा आढावा घेतला जात आहे. मात्र, नाशिकचा उमेदवार कोणताही ठरो. मग तो भाजपचा असो, राष्ट्रवादी काँग्रेसचा असो किंवा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा असो, जो उमेदवार दिला जाईल, त्याच्या पाठीमागे सर्वजण ताकतीने उभे राहतील, असे मत मंत्री छगन भुजबळ यांनी यांनी व्यक्त केले.
नाशिक मतदार संघ हा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटावा, अशी मागणी करण्यात येत आहे. मात्र, महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीत आल्यामुळे नाशिकमध्ये पेच निर्माण झाल्याची चर्चा सुरू आहे. यावर भुजबळांनी आपले मत मांडले. मनसेमुळे नाशिकमध्ये पेच नव्हे, तर शक्ती वाढल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय शिंदे गटाएवढ्या आम्हालाही जागा द्या, या मागणीचा पुनरुच्चारही त्यांनी यावेळी केला.
भुजबळ कुटुंबीयांसाठी कोणत्याही मतदारसंघातून उमेदवाराची मागणी केलेली नाही. केवळ एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला जेवढ्या जागा दिल्या जातील तेवढ्यात जागा या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला देखील दिल्या जाव्यात, अशी माझी पहिल्यापासून मागणी आहे. मात्र, भुजबळ कुटुंबातील एकही व्यक्तीसाठी मी उमेदवारी मागितली नसल्याचे छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्र्यांच्या भेटीचा राजकीय अर्थ नको
काही दिवसांपूर्वी छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. या भेटीत नाशिकच्या जागेबाबत चर्चा झाली का? असा प्रश्न छगन भुजबळ यांना पत्रकारांनी विचारला. यावर छगन भुजबळ यांनी स्पष्ट शब्दात नकार दिला. माझी जर काही मागणी असेल तर मी अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्याकडे मांडेल.
आम्ही बसून त्यावर निर्णय घेऊ. त्यासाठी एकनाथ शिंदे यांच्याकडे जाण्याचा प्रश्न नसल्याचे ते म्हणाले. एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेल्या नगर विकास खात्यात संदर्भातला एक काम होते. आमच्या भेटीमध्ये कोणतेही राजकारण नव्हते. त्यामुळे शिवसैनिकांनी नाराज होण्याचे काही कारण नाही, असे देखील ते म्हणाले.





