Satara | मुलींसाठी कॅन्सर लसीकरण शिबिर आज रहिमतपूर येथे

रहिमतपूर, (प्रतिनिधी)- कॅन्सर पेशंट एड असोसिएशन, हिरकणी फाउंडेशन आणि रहिमतपूरचे पंचक्रोशी शिक्षण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि. १३ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते दुपारी ३ यावेळेत डॉ. काकासाहेब परांजपे विद्यालयात नऊ ते अठरा वयोगटातील मुलींसाठी ‘गर्भाशय मुखाचा कर्करोग मोफत लसीकरण शिबिर’ आयोजित केले आहे,
अशी माहिती भाजपच्या प्रदेश महिला मोर्चा आघाडीच्या उपाध्यक्षा व पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा सौ. चित्रलेखा माने- कदम यांनी दिली
या शिबिरात मोलेक्युलर ऑन्कोलाॅजिस्ट संशोधन अभ्यास आणि अतिरिक्त प्रकल्प कार्यक्रम संचालिका डॉ. नृपर खरे (मुंबई), पिंकहोलिक इंडिया फाउंडेशनच्या संस्थापिका व सातारा जिल्हा वैद्यकीय सहाय्यता निधी महिला कक्षप्रमुख सौ. जयश्री पार्टे- शेलार,
सातारा येथील नंदादीप हॉस्पिटलच्या स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. स्वप्नजा शेटे, रहिमतपूर येथील सुलोचना बाल रुग्णालयाच्या डॉ. ज्ञानेश्वरी माने सहभागी होणार आहेत.
९ ते १८ वयोगटातील मुलींसाठी आयोजित केलेल्या या लसीकरण शिबिरात सहभागी होण्यासाठी मुलींनी आपले आधार कार्ड, केशरी, पिवळे रेशनकार्ड सोबत आणावे. या शिबिराचा लाभ रहिमतपूर व परिसरातील मुलींनी घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.





