Cancer cells : कर्करोग पेशी शोधासाठी पुण्यात स्वदेशी तंत्रज्ञान
Cancer cells :

डॉ. जयंत खंदारे यांचे संशोधन; केंद्राकडून ऑनकोडिस्कव्हर उपकरणास मान्यता
Cancer cells : रक्तातील कर्करोगाच्या पेशी शोधण्यासाठी पुण्यातील ॲक्टोरियस इनोव्हेशन्स अँड रिसर्च लॅबने स्वदेशी तंत्रज्ञान विकसित केले आहे. या उपकरणाला केंद्र सरकारच्या केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेकडून (सीडीएससीओ) मान्यता मिळाली आहे. डॉ. जयंत खंदारे यांनी जर्मनी, फ्रान्समधील शास्त्रज्ञांच्या सहकार्याने हे संशोधन केले आहे.
ऑनकोडिस्कव्हर असे उपकरणाचे नाव आहे. रक्तातील कर्करोगाच्या पेशी ओळखण्यासाठी त्याचा वापर केला जातो. रक्ताच्या नमुन्यातील विशिष्ट पेशी वेगळ्या करून सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने त्यांची ओळख पटवली जाते.
कर्करोगाचे निदान आणि उपचारांनंतर रुग्णाच्या स्थितीचा अभ्यास करण्यासाठी हे तंत्रज्ञान पूरक ठरू शकते. सध्या कर्करोगाच्या गाठींचा शोध घेण्यासाठी पीईटी-सीटी तपासणी केली जाते.
मात्र, रक्तातील कर्करोगाच्या पेशींची माहिती मिळवण्यासाठी रक्ततपासणी उपयुक्त ठरू शकते. या तंत्रज्ञानामुळे कर्करोग पुन्हा उद्भवण्याच्या धोक्याचा अभ्यास करण्यासाठी अतिरिक्त माहिती मिळू शकते. मात्र, त्यासाठी अधिक वैद्यकीय पुरावे आवश्यक आहेत.
डॉ. खंदारे यांनी सांगितले की, पीईटी-सीटी तपासणीनंतरही रक्तात काही कर्करोगाच्या पेशी राहू शकतात. अशा पेशींचा अभ्यास करण्यासाठी हे तंत्रज्ञान पूरक माहिती देते. त्यामुळे परदेशी तंत्रज्ञानावरील अवलंबित्व कमी होण्यास आणि चाचण्या अधिक सुलभ होण्यास मदत होऊ शकते.
जर्मनीचे डॉ. क्लाऊस पँटेल आणि फ्रान्सच्या डॉ. कॅथरीन अॅलिक्स-पॅनाबियेर यांनीही या संशोधनाचे महत्त्व अधोरेखित केले. लवकर माहिती मिळाल्यास उपचारांचे नियोजन प्रभावीपणे करता येऊ शकते, असे त्यांनी नमूद केले.





