Origin of Mosquitoes: डास नियंत्रणासाठी १७ अधिकारी नियुक्त
Origin of Mosquitoes:

डासांची उत्पत्ती आढळल्यास पालिकेला कळविण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन
Origin of Mosquitoes: शहरात डेंग्यू, चिकुनगुनिया यांसारख्या कीटकजन्य आजारांचा धोका टाळण्यासाठी पुणे महापालिकेच्या आरोग्य व कीटकजन्य आजार नियंत्रण विभागाने नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
घरातील पाण्याच्या टाक्या, ड्रम, बॅरल, पिंपे आणि पाण्याची भांडी झाकून ठेवावीत. पाणी साठविण्याची भांडी नियमितपणे घासून स्वच्छ करावीत, असे आवाहन केले आहे. तसेच, क्षेत्रीय कार्यालयनिहाय नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांना संपर्क करण्यासाठी १७ अधिकारी नियुक्त केले आहेत.
घराच्या परिसरात तसेच सोसायट्यांमध्ये जुन्या टायरमध्ये, प्लास्टिकच्या डब्यांमध्ये, कुंड्यांच्या ताटल्यांमध्ये आणि इतर ठिकाणी पाणी साचणार नाही, याची काळजी घ्यावी. फ्रिज, कुलर, फुलदाण्या आदी ठिकाणी साचलेले पाणी नियमितपणे काढून टाकावे.
घराभोवतीच्या परिसरात स्वच्छता राखावी आणि डासांची उत्पत्ती होणारी ठिकाणे नष्ट करावीत. डासांपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी पूर्ण बाह्यांचे कपडे परिधान करावेत.
डासांच्या वाढीस पोषक ठरणाऱ्या ठिकाणांची नियमित तपासणी करावी. ताप, अंगदुखी, डोकेदुखी यांसारखी लक्षणे आढळल्यास तातडीने पालिकेच्या रुग्णालयात जाऊन तपासणी करून घ्यावी. डेंग्यू, मलेरिया आदी आजारांची लक्षणे आढळल्यास उपचार घेण्यास विलंब करू नये, असे आवाहनही पालिकेने केले आहे.
साठलेल्या पाण्यात डासांच्या अळ्या किंवा डासांची उत्पत्ती होत असल्याचे आढळल्यास नागरिकांनी पुणे महापालिकेच्या स्थानिक क्षेत्रीय कार्यालयाशी संपर्क साधावा. संबंधित क्षेत्रीय कार्यालयांमार्फत आवश्यकतेनुसार औषध फवारणी करण्यात येईल.
या अधिकाऱ्यांची नियुक्ती -Origin of Mosquitoes:
डासोत्पत्ती टाळण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधून औषध फवारणी करून घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. त्यासाठी मुरली ताते, विश्वनाथ बोराटे, स्वप्नील करंजकर, गोविंद सातपुते, गिरीश कळसकर, अमोल हवालदार, विशाल पडवळ, आनंद चाबुकस्वार, फकीर शेख, विशाल रुपनर, निलांबर खरात, राजेंद्र धायरकर, गणपत शिंदे, राजू उकरंडे, युवराज होले, प्रकाश मोरे, रोहन चव्हाण आदी अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.





