Canal Damaged: शिरूरमध्ये थेट कालवाच फोडला? अनधिकृतपणे पाणी वळवल्याने लाखांचे नुकसान, एकावर गुन्हा
Canal Damaged: पाण्याचा नैसर्गिक प्रवाह बदलल्यामुळे इतर शेतकऱ्यांचा सिंचनाचा पाणीपुरवठा धोक्यात; नियमित पाहणी मोहीम राबवण्याची शेतकऱ्यांची मागणी.

Canal Damaged – शिरुर तालुक्यातील वडगाव रासाई येथे पाटबंधारे विभागाच्या कालव्याला अनधिकृतपणे भगदाड पाडून पाइपलाइनद्वारे सायपन पद्धतीने पाणी वळवल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे सिंचनाच्या पाणीपुरवठ्यामध्ये अडथळा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली असून, शासनाच्या सार्वजनिक मालमत्तेचे सुमारे १ लाख ३१ हजार ७५० रुपयांचे नुकसान झाले आहे.
या प्रकरणी सुशांत अशोक शेलार, (रा. वडगाव रासाई, ता. शिरुर, जि. पुणे) याच्याविरुद्ध शिरुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटबंधारे विभागात कालवा निरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या प्राजक्ता विठ्ठल वाठे (वय २९, रा. भिवरी, ता. हवेली, जि. पुणे) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
ही घटना (दि.१४) रोजी सायंकाळी वडगाव रासाई गावच्या हद्दीत सुशांत शेलार यांच्या शेताजवळ घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. फिर्यादीत नमूद केलेल्या माहितीनुसार, आरोपीने पाटबंधारे उपविभाग, शिरुर यांची कोणत्याही प्रकारची पूर्व परवानगी घेतली नव्हती. तरीही कालव्याला चुकीच्या पद्धतीने छेद देऊन पाइपलाइन सायपन बसविल्याचा आरोप आहे. या सायपनद्वारे कालव्यातील पाण्याचा नैसर्गिक प्रवाह बदलून अनधिकृतरीत्या पाण्याचा वापर केला.
या कृतीमुळे कालव्याची रचना खराब झाली असून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाल्याचे पाटबंधारे विभागाच्या निदर्शनास आले. कालवा फोडून पाण्याचा प्रवाह बदलल्यामुळे परिसरातील इतर शेतकऱ्यांना सिंचनासाठी मिळणाऱ्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. कालव्याच्या सुरक्षिततेलाही धोका निर्माण होऊ शकतो.
या प्रकारामुळे शासनाच्या मालकीच्या कालव्याचे अंदाजे १ लाख ३१ हजार ७५० रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज पाटबंधारे विभागाने व्यक्त केला आहे. शिरुर पोलिसांत आरोपीविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. शिरुर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गवळी पुढील अधिक तपास करत आहेत.
कालव्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
कालवा फोडल्याच्या घटनेमुळे शिरुर तालुक्यातील पाटबंधारे विभागाच्या कालव्यांची सुरक्षा, अनधिकृत पाइपलाइन, बेकायदेशीर पाणी उपशाबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. कालवे अनधिकृतपणे फोडणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याबरोबरच पाटबंधारे विभागाने नियमित पाहणी मोहीम राबवावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे.






