Justin Trudeau : कॅनडाचे पंतप्रधान ट्रुडो यांना घरचा आहेर; एकेकाळच्या सहकारी पक्षाच्या नेत्याकडून अविश्वास ठरावाच्या हालचाली सुरू

टोरांटो : कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या सरकारचे भवितव्य अधिकच अस्थिर बनले आहे. ट्रुडो सरकारचा एकेकाळचा महत्वाचा मित्र पक्ष असलेल्या न्यू डेमोक्रॅटिक पार्टीचे नेते जगमित सिंग यांनी अल्पमतातल्या लिबरल सरकारला पाडण्यासाठी आपण ठराव मांडणार असल्याचे जाहीर केले आहे. यामुळे ट्रुडो यांना एकप्रकारे घरचा आहेर मिळाला आहे.
जगमित सिंग यांचा पक्ष नेहमी ट्रुडो सरकारला मदतच करत राहिला आहे. मात्र आता लिबरल पार्टीच्या सरकारवर विश्वास उरला नसल्यामुळे पुढील वर्षी या सरकारविरोधात अविश्वास ठराव मांडणार असल्याचे जगमित सिंग यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या खुल्या पत्रात म्हटले आहे. कॅनडामध्ये ऑक्टोबरमध्ये किंवा त्यापुर्वी निवडणुका होणे अपेक्षित आहे. मात्र जर जगमित सिंग यांच्या अविश्वास ठरावाला विरोधकांनी मदत केली, तर कॅनडामध्ये मुदतपुर्व निवडणुका होऊ शकतात.
ट्रुडो यांच्या सरकारविरोधात उभे ठाकलेल्या तीन प्रमुख विरोधी पक्षांपैकी जगमित सिंग हे अखेरचे विरोधी नेते आहेत. लिबरल पक्षाला पुन्हा संधी मिळता कामा नये. म्हणूनच संसदेचे कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर एनडीपी सरकारविरोधात अविश्वास ठराव मांडणार आहे, असे जगमित सिंग यांनी म्हटले आहे. कॅनडाच्या संसदेला सध्या हिवाळ्याची सुटी आहे. दिनांक २७ जानेवारीपासून संसदेचे कामकाज पुन्हा सुरू होणार आहे.
अंतर्गत कलह आणि मंत्रिमंडळाचा विस्तार
ट्रम्प यांच्याकडून कॅनडावर आयात शुल्क लादले जाण्याची घोषणा केल्यावर ट्रुडो सरकारमधील उपपंतप्रधान क्रिस्तिया फ्रिलॅन्ड यांनी अलिकडेच ट्रुडो यांच्यावर नाराज होऊन राजीनामा दिला आहे. त्यांच्याशिवाय गृहनिर्माण मंत्री सीन प्रेजर यांनीही राजीनामा दिला आहे. लिबरल पार्टीतील जवळपास एक तृतीयांश खासदारांकडून ट्रुडो यांच्या राजीनाम्याची मागणी केली होते आहे. अंतर्गत कलह मिटवण्यासाठी ट्रुडो यांनी कालच त्यांच्या मंत्रिमंडळात फेरबदल करून आठ नवीन मंत्र्यांचा समावेश केला आहे.





