Canada | indian students : कॅनडा सरकारने 2026 ते 2028 या कालावधीसाठी नव्या इमिग्रेशन लेव्हल्स प्लॅनची घोषणा केली असून, यावेळी नियम अधिक कडक करण्यात आले आहेत. देशाने कायमस्वरूपी रहिवाशांच्या (Permanent Residents) संख्येला स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला असला, तरी विदेशी विद्यार्थी आणि तात्पुरत्या व्हिसाधारकांवर मोठी मर्यादा लावली जाणार आहे. सरकारच्या नव्या नियोजनानुसार, पुढील तीन वर्षांत दरवर्षी सुमारे 3.80 लाख कायमस्वरूपी रहिवाशांना मंजुरी दिली जाईल. मात्र, तात्पुरत्या रहिवाशांचा वाटा देशाच्या लोकसंख्येच्या 5 टक्क्यांपेक्षा कमी ठेवण्याचे उद्दिष्ट ठेवले गेले आहे. या निर्णयाचा भारतीय विद्यार्थी आणि कामगारांवर थेट परिणाम होणार आहे. विदेशी विद्यार्थ्यांवर सर्वात मोठा आघात : कॅनडाने आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठीच्या व्हिसा मर्यादांमध्ये जवळपास 50% कपात केली आहे. 2026 मध्ये फक्त 1.55 लाख, 2027-2028 मध्ये केवळ 1.50 लाख विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी परवानगी दिली जाईल. 2023 अखेरीस कॅनडात 10 लाखांपर्यंत विदेशी विद्यार्थी होते, पण 2024 मध्ये सरकारने स्टडी परमिटवर ‘कॅप’ लावल्यानंतर आता संख्येत मोठी घट होण्याची शक्यता आहे. शिक्षणतज्ज्ञांच्या मते, हा निर्णय कॅनडाच्या शिक्षण क्षेत्रासाठी धक्का ठरेल. आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांची संख्या कमी झाल्याने कॉलेज व विद्यापीठांच्या आर्थिक स्थितीवर आणि विविधतेवर परिणाम होणार आहे. भारतावर सर्वाधिक परिणाम : भारत हा कॅनडा कडे सर्वाधिक विद्यार्थी पाठवणारा देश आहे. मात्र, आता भारतीय विद्यार्थ्यांना व्हिसा मिळवणे अधिक अवघड होणार आहे. सध्या 50% भारतीय विद्यार्थी व्हिसा अर्ज फेटाळले गेले असल्याचं सांगण्यात आलं आहे. ऑगस्ट 2025 मध्ये 74% भारतीय विद्यार्थी व्हिसा अर्ज फेटाळले गेले, जे मागील वर्षाच्या दुप्पट आहेत. सरकारने सांगितले आहे की, त्यांना भारत आणि बांगलादेशातून बनावट अॅडमिशन लेटर्स आणि खोट्या दस्तऐवजांचे हजारो प्रकरणे सापडली आहेत. त्यामुळे आर्थिक पुरावे आणि कॉलेज व्हेरिफिकेशन प्रक्रिया अधिक कठोर करण्यात आली आहे. कामगारांसाठीही कडक नियम : विद्यार्थ्यांप्रमाणेच तात्पुरत्या कामगारांवरही निर्बंध आणले आहेत. 2026 मध्ये फक्त 2.30 लाख कामगारांना परवानगी, पुढील दोन वर्षांत ही संख्या 2.20 लाखांवर मर्यादित ठेवली जाईल. मात्र, सरकारने 33,000 कामगारांना कायमस्वरूपी रहिवासाचा (PR) मार्ग खुला करण्याची घोषणा केली आहे. विशेषतः आरोग्यसेवा, बांधकाम आणि फ्रेंच भाषिक क्षेत्रांमध्ये. एकंदरीत, कॅनडाच्या या नव्या धोरणामुळे विदेशी विद्यार्थ्यांना आणि भारतीय युवकांना नवे आव्हान निर्माण झाले असून, शिक्षण आणि रोजगारासाठीचे ‘फेव्हरेट डेस्टिनेशन’ असलेले कॅनडा आता कडक प्रवेशद्वाराच्या टप्प्यात पोहोचले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे.