पाबळ : नगरपालिका व नगरपरिषदांच्या मतमोजणीवरील न्यायालयीन गोंधळ २१ डिसेंबरच्या निकालाने संपुष्टात आला असला तरी, सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केल्याप्रमाणे सर्व निवडणुका ३१ जानेवारी २०२६ पूर्वीच घेण्याचे आदेश कायम ठेवले आहेत. यामुळे जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकाही याच अंतिम मुदतीच्या आत घेण्यात येतील हे आता अधोरेखित झाले आहे. या पार्श्वभूमीवर, शिरूर तालुक्यातील पाबळ-केंदूर गटात निवडणुकीपूर्वीच प्रचारपूर्व भेटीगाठी सुरू झाल्या आहेत. एका उमेदवाराचे नातेवाईक आणि समर्थक घरोघरी जाऊन भेट घेत आहेत. विशेष म्हणजे, या गटात अजूनही कोणत्याच प्रमुख पक्षाचे उमेदवार निश्चित झालेले नसताना, यापूर्वीच मतदारांना तीर्थयात्रा घडवून आणण्यात यशस्वी झालेल्या उमेदवाराचे कार्यकर्ते आता अधिक सक्रिय झाले आहेत. जिल्हा परिषद निवडणुकांचे बिगुल वाजण्याआधीच मतदारांना तीर्थयात्रा घडवून आणल्यामुळे पाबळ-केंदूर गटात प्रमुख पक्षांच्या संभाव्य उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. नगरपालिका निवडणुकीतील न्यायालयीन गोंधळामुळे शांतता निर्माण झाली असली तरी, सर्वोच्च न्यायालयाच्या ठाम भूमिकेमुळे ३१ जानेवारी अखेर निवडणुका पर पाडाव्या लागणार आहेत. यामुळे पूर्वतयारीत असलेल्या वढू बुद्रुक येथील उमेदवाराने आपली संपर्क यंत्रणा पुन्हा कार्यान्वित करून प्रचारपूर्व भेटीगाठी सुरू केल्या आहेत. पाबळ गटात यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिपत्य होते, मात्र अलीकडे पक्षात फूट पडून शरद पवार गट व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अशी दुफळी निर्माण झाली आहे. तसेच, या भागात भाजपचे प्राबल्य दुर्लक्षित करण्याजोगे नाही. त्यामुळे या तिन्ही पक्षांकडून कोणाला उमेदवारी जाहीर केली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ‘काही झालं तरी निवडणूक लढवायचीच’, या भूमिकेतून प्रभावी जनसंपर्क, मतदारांना देवदर्शन आणि मतदारांची प्रत्यक्ष गाठ भेट यात आघाडी घेतलेल्या वढू बुद्रुक येथील प्रफुल्ल शिवले यांनी पुन्हा एकदा प्रचारपूर्व आघाडी घेऊन आपली भूमिका कायम ठेवली आहे. याच पार्श्वभूमीवर, नेमक्या कोणत्या पक्षाकडून शिवले यांना उमेदवारी मिळते, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे, तर दोन्ही राष्ट्रवादी व भाजपकडून कोणाची उमेदवारी जाहीर होते याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, पाबळ येथे माजी सरपंच अंजली प्रफुल्ल शिवले व यशराज प्रफुल्ल शिवले यांनी तरूण कार्यकर्त्यांसह भेटीगाठी घेतल्या असून, त्यांनी निवडणूक प्रचारात मोठी आघाडी घेतल्याची आणि महिलांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.