satara | आदर्श माता पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन

सातारा , (प्रतिनिधी) – येथील ज्ञानविकास मंडळाच्यावतीने प्रतिवर्षाप्रमाणे सातारा जिल्ह्यातील आदर्श मातांचा सत्कार करण्यात येणार आहे. यासाठी प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन मंडळाचे कार्याध्यक्ष प्रसाद चाफेकर यांनी केले आहे.
आदर्श माता सत्कार उपक्रमाचे हे 35 वे वर्ष आहे. हा सत्कार समारंभ मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होणार आहे. ज्ञानविकास मंडळाने आजपर्यंत 160 मातांना गौरवले आहे. प्रत्येक माता तिच्या मुलांसाठी आदर्शच असते. आपल्या मुलांवर सुसंस्कार व्हावेत, हाच तिचा ध्यास असतो.
ज्या मातांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपल्या मुलांना शिकवून, त्यांच्यावर सुसंस्कार केले आहेत आणि त्यांना स्वतःची वेगळी ओळख निर्माण करून देण्यासाठी आयुष्य वेचले आहे, अशा सातारा जिल्ह्यातील आदर्श मातांचा सत्कार करण्यात येणार आहे.
आदर्श मातेचे वय 65 वर्षे पूर्ण असावे. अशा मातांच्या नातलगांनी किंवा संबंधितांनी त्यांची संपूर्ण माहिती दोन ते तीन पानांच्या मजकुरात, आठ वैयक्तिक छायाचित्रांसह साठे जनरल स्टोअर्स, प्रतापगंज पेठ, सातारा या पत्त्यावर रविवार, दि. 17 पर्यंत पाठवावी अथवा समक्ष आणून द्यावी, असे आवाहन चाफेकर यांनी केले आहे.





