प्लेसरविले – उत्तर कॅलिफोर्नियाच्या जंगलातील वणव्याची आग अद्याप नियंत्रणात आली नाही. अकरा हजार कर्मचारी ती आग विझवण्याच्या कामी अहोरात्र झटत आहेत. या आगीची झळ अनेक घरांना आणि इमारतींना बसली असून तेथून हजारो नागरीकांना पलायन करावे लागले आहे. अमेरिकेच्या वनविभागाने त्या भागातील नऊ राष्ट्रीय वने 22 ऑगस्ट पासून बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
उत्तर कॅलिफोनिर्यातील जंगलाला लागलेल्या आगीच्या झळा लांब अंतरापर्यंत जाणवत असून हा वणवा अधिक धोकादायक वळण घेताना दिसून येत आहे. उत्तर सिएरा, नेवाडा आणि दक्षिण कॅसकेड्स या जंगलांना 13 जुलै रोजी ही आग लागली होती. ती आता 1060 चौरस मैल परिसरात पसरली आहे. ही आग आत्तापर्यंत केवळ 35 टक्के विझली आहे. अजूनही आगीचा बराच भाग पुर्ण विझवण्यात आलेला नाही. या वणव्यात एकूण 1200 इमारती आणि 649 घरे जळून खाक झाली आहेत. आगीच्या अन्य नुकसानीचा अजून अंदाज घेण्याचे काम सुरूच आहे..