कॅलिफोर्नियातल्या वणव्यातील मृतांची संख्या ११ वर; १ लाख नागरिकांना स्थलांतर करण्याचे आदेश

लॉस एंजेलिस – अमेरिकेत लॉस एंजेलिस काउंटीजवळ लागलेल्या वणव्यामध्ये आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार १३ हजारांहून जास्त इमारती या आगीत नष्ट झाल्या असून जवळपास १ लाखाहून अधिक रहिवाशांना स्थलांतराचे आदेश देण्यात आले आहेत. सध्या या प्रदेशात चार मोठे वणवे लागले आहेत.
सांता मोनिका आणि मालिबू दरम्यान सर्वात मोठी आग लागली असून कालपर्यंत ही आग आठ टक्के आटोक्यात आली आहे. तर अल्टाडेना आणि पासाडिना जवळ लागलेली आग ३ टक्के आटोक्यात आली आहे. दोन्ही आगी आता कॅलिफोर्नियाच्या इतिहासातील पाच सर्वात विनाशकारी आगींमध्ये समाविष्ट आहेत.
दरम्यान, पाणी व्यवस्थापनाशी संबंधित तक्रारीची चौकशी करण्याचे आदेश कॅलिफोर्नियाच्या गव्हर्नरनी दिले आहेत. लॉस एंजेलिसमध्ये लागलेला वणवा अनेक महिने सुरू राहण्याची शक्यता आहे. मंगळवारी लागलेल्या आगी कशामुळे लागल्या हे अद्याप स्पष्ट झालेले नाही आणि तपासकर्त्यांना कोणत्याही ठोस निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी महिने लागतील.
आगीमुळे बेघर झालेल्या नागरिकांनी तात्पुरती सोय म्हणून रस्त्याच्या कडेला छावण्यांसारक्या झोपड्या बांधायला सुरुवात केली आहे. तर ज्या भागात आग आटोक्यात आली आहे, तेथील नागरिकांनी आपल्या जळालेल्या घरातील वस्तू आणण्याचा प्रयत्नही सुरू केला आहे.
या वणव्यामुळे लागलेल्या आगीत हॉलीवूड मधील अनेक चित्रपट कलाकार आणि मान्यवरांना घरे गमवावी लागली आहेत. या वणव्यात आतापर्यंत अंदाजे १७ हजार एकरपेक्षा अधिक जमिनीला आगीची झळ बसली असून, या विनाशकारी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दल शर्तीचे प्रयत्न करत आहे.





