Pune News : आंबेडकरी चळवळीतील एक पर्व संपले ; ज्येष्ठ साहित्यिक-विचारवंत डॉ. सी. पी. थोरात यांचे निधन

प्रभात वृत्तसेवा
पुणे – आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ साहित्यिक-विचारवंत डॉ. चंद्रकांत पिलाजी ऊर्फ सी. पी. थोरात (वय ८७) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.त्यांच्यामागे पत्नी आणि तीन कन्या असा परिवार आहे. थोरात यांच्या पार्थिवावर रविवारी कोरेगाव पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.ते भारत मोसम विज्ञान विभागातील सेवानिवृत्त शास्त्रज्ञ आणि बहुजन समाज पक्षाचे संस्थापक काशीराम यांचे जवळचे सहकारी होत. त्यांचे दोन शोधनिबंध आंतरराष्ट्रीय विज्ञान पत्रिकेमध्ये प्रसिद्ध झाले आहेत.
त्यांनी दक्षिण ध्रुवावरील हवामानाचे अंदाज पुण्यातून देण्याचा प्रकल्प सुरू केला. त्यामुळे देशाच्या दक्षिण ध्रुवावरील मोहिमेला प्रोत्साहन मिळाले. १९९७ मध्ये त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती.थोरात यांचे आई-वडील आंबेडकरी चळवळीत सक्रिय असल्याने लहानपणापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सहवास त्यांना लाभला. बी. एस्सीच्या शेवटच्या वर्षापासून द बुद्ध अँड हिज धम्मा या इंग्रजी ग्रंथातील बुद्ध धम्म पुण्यातील लोकांना पहिल्यांदा समजावून सांगण्याचे कार्य त्यांनी केले.
इंग्लंड येथील विद्वान भंते संघरक्षितजी यांच्याकडून त्यांना बाबासाहेबांचा बुद्ध धम्म शिकावयास मिळाला. मुंबईच्या कुलाबा वेधशाळेत १९६१ ते १९६७ फेब्रुवारीपर्यंत कार्यरत असताना त्यांनी सभा घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव मराठवाडा विद्यापीठाला द्यावे म्हणून आंदोलन केले होते. १९७१ पासून कोरेगाव भीमा क्रांती स्तंभास मानवंदना देण्याचा कार्यक्रम त्यांनी सुरू केला.
विदर्भ वगळता राज्यातील सर्व जिल्ह्यांत प्रशिक्षण शिबिरे घेऊन त्यांनी शेकडो कार्यकर्ते बामसेफ संघटनेमध्ये समाविष्ट केले.थोरात हे काशीराम यांचे निकटचे सहकारी होते. त्यांची काशीराम : मनुवाद को चुनौती, पुणे समझौता, सम्राट अशोक, काशीरामके साथ आंबेडकरी मिशन ही पुस्तके प्रसिद्ध आहेत.





