सातारा | सभासदत्व न दिल्याने ॲड. शिरगावकर संतप्त

सातारा – माजी जिल्हा सरकारी वकील विकास शिरगावकर पाटील यांना केवळ ५० हजार रुपयात सातारा क्लबचे सभासदत्व हवे होते. मात्र, तशी तरतूद नसल्याने त्यांना क्लबचे सभासदत्व देता येत नव्हते. याच नैराश्यातून त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली खदखद व्यक्त केली असल्याचा खुलासा सातारा क्लब फोरमने प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे. तसेच हणमंत किसन फरांदे त्यांच्या वैयक्तिक आकसापोटी सातारा क्लब फोरमची नाहक बदनामी करीत आहेत. याबाबत क्लब व्यवस्थापन त्यांच्यावर उचित कायदेशीर कारवाई करणार असून फरांदे सभासदांमध्ये स्वार्थासाठी नाहक गैरसमज पसरवत आहेत, असेही या पत्रकात म्हटले आहे.
पत्रकातील माहितीनुसार हणमंत फरांदे यांना फेब्रुवारी २००३ मध्ये क्लबमध्ये इन्व्हर्टर बसविणे व इलेक्ट्रिक मेंटेनन्स पाहणे या बदल्यात सभासदत्व मंजूर केले होते. फरांदे यांच्या कामाच्या दर्जाबाबत अनेक तक्रारी आल्याने तसेच सेवा वेळेत मिळत नसल्याने दि. २५ मार्च २०१९ मध्ये फरांदे यांचे विद्युत कामाच्या दुरुस्तीसाठी दिलेले कॉन्ट्रॅक्ट रद्द केले, या आकसापोटी व त्याचा राग मनात धरून फरांदे यांनी क्लब व्यवस्थापनास नाहक त्रास देण्यास सुरुवात केली. क्लब नूतनीकरणा अडथळे निर्माण करणे, विद्युत साहित्य खरेदीबाबत आक्षेप घेणे, विद्युत ठेकेदारांना धमकवणे, सभासदांशी गैरवर्तणूक करणे, अशा प्रकारचे वर्तन त्यांनी केले.
सातारा क्लबची स्थापना ब्रिटिश सरकारने १८८५ मध्ये केली.परंतु, त्याची कुठेही नोंदणी झाली नसल्याने सातारा क्लब फोरम या नावाने दि. ६ जानेवारी २०२३ रोजी कंपनी कायदा २०१३ मधील कलम (८) अन्वये नोंदणी करण्यात आली आहे. क्लबला तसे प्रमाणपत्र मिळाले आहे. क्लबमध्ये जमा झालेल्या सभासद शुल्कातून करण्यात येणारा प्रत्येक कामाच्या खरेदीच्या निविदा मागवून त्यावर नियुक्त तांत्रिक कमिटीमार्फत शहानिशा होऊन कार्यकारणी समिती सदस्य सभेमध्ये त्यास मंजुरी घेण्यात येते. त्या अनुषंगाने पुढे होणारा प्रत्येक खर्च तांत्रिक कमिटीमार्फत मंजूर करून त्याला सचिव मान्यता देतात. अध्यक्षांच्या अंतिम मंजुरीनंतरच देयके अदा केली जातात, असे या पत्रकात म्हटले आहे.





