7 राज्यांच्या 13 विधानसभा जागांवर पोटनिवडणूक संपन्न

नवी दिल्ली : 7 राज्यांतील 13 विधानसभा जागांवर पोटनिवडणुकीसाठी बुधवारी मतदान पार पडले. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पहिल्यांदाच निवडणुका झाल्या आहेत. 13 जागांवर निवडणूक लढवणाऱ्या सर्व 121 उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले आहे. आता 13 जुलै रोजी मतमोजणी होणार आहे.
सात राज्यांतील 13 विधानसभा जागांवर पोटनिवडणुकीसाठी बुधवारी (10 जुलै) मतदान झाले. त्यापैकी सर्वाधिक चार जागा पश्चिम बंगालच्या होत्या. त्याचवेळी हिमाचल प्रदेशातील तीन आणि उत्तराखंडमधील दोन, तर बिहार, मध्य प्रदेश, पंजाब आणि तामिळनाडूमधील प्रत्येकी एका जागेचा समावेश आहे. विधानसभेच्या १३ जागांपैकी मध्य प्रदेशातील अमरवाडा मतदारसंघात सर्वाधिक ७८.३८ टक्के मतदान झाले. तर उत्तराखंडमधील बद्रीनाथ मतदारसंघात सर्वात कमी 47.68 लोकांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
या निवडणुकीत हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांच्या पत्नी कमलेश ठाकूर यांच्यासह अनेक दिग्गज आणि काही नवीन चेहऱ्यांनी नशीब आजमावत आहे. दरम्यान, पोटनिवडणूक झालेल्या जागांपैकी गतवेळी भाजप आणि अपक्ष उमेदवारांनी प्रत्येकी सर्वाधिक तीन जागा, तर काँग्रेसने दोन जागा जिंकल्या होत्या. तसेच टीएमसी, बसपा, जेडीयू, आप आणि द्रमुकचा प्रत्येकी एक उमेदवार विजयी झाला होता.





