“…पण असं कोण म्हटलं की, मराठ्यांना ओबीसींमधून आरक्षण द्या?”; पंकजा मुंडेंनी केली भूमिका स्पष्ट

बीड : राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. जालन्यात मनोज जरांगे हे या आरक्षणासाठी गेल्या दहा दिवसांपासून उपोषण करत आहेत. मराठा समाजाला सरसकट कुणबी म्हणून ओबीसींमधून आरक्षण द्यावे या मागणीवर ते ठाम आहेत. पण आता त्यांच्या या मागणीला स्वतः कुणबी समाज आणि ओबीसी समाजाकडून विरोध सुरु झाला आहे. त्यातच आता यावर ओबीसी नेत्या पंकजा मुंडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
आरक्षणविषयी बोलताना पंकजा मुंडे यांनी, “मराठा आरक्षणाचा विषय सध्या महाराष्ट्रात सगळीकडं आहे. मुळात ओबीसीतून आरक्षणाची मराठा समाजाची मागणी नव्हती. त्यांची साधी, प्रामाणिक अशी मागणी होती की आम्हाला आरक्षण द्या. त्यांच्यातील जो समाज वंचित राहिलेला आहे, मुख्य प्रवाहातून बाहेर राहिला होता. त्याला आरक्षण देण्याविषयी सर्वांची मान्यता होता. अगदी गोपिनाथ मुंडे असल्यापासून ते आत्ताच्या सर्व नेत्यांची याला मान्यता आहे”असे त्यांनी म्हटले आहे.
पुढे बोलताना त्यांनी,”आमची जी भूमिका आहे ती पहिल्यापासून स्पष्ट आहे. मराठा आरक्षणाला आमचं समर्थन आहे. पण असं कोण म्हटलं की, मराठ्यांना ओबीसींमधून आरक्षण द्या? असं कोणी मगणी करणं आणि ते मिळणं शक्य नसतं. संविधानिक दृष्ट्या बऱ्याच गोष्टी शक्य होत नाहीत. मराठा समाजाला खरंखरं आरक्षण पाहिजे जे कोर्टात टिकेल ते दिलं गेलं पाहिजे” असेही पंकजा मुंडे यांनी म्हटले.
मराठा आरक्षणासाठी जे तरुण आत्महत्या करताहेत त्यांच्याबाबत मला खूपच वाईट वाटत आहे. मी मराठा समाजाच्या सर्व तरुणांना हात जोडून विनंती करते की, तुमची जी मागणी आहे ती करा, पण त्यासाठी स्वतःचा जीव वैगरे द्यायाचा विचार करु नका. छत्रपती शिवरायांचे आपण वंशज आहोत त्यांच्या विचारांनी लढण्याच्या भूमिकेनं लढा. स्वतःचा जीव देण्यासारखं लेकरांनी काम करु नये, अशा शब्दांत पंकजा मुंडे यांनी मराठा आरक्षणावर आपली भूमिका स्पष्ट केली.





