Sharad Ponkshe : ….पण या भानगडीत एक गोष्ट आपण विसरुनच गेलो; शरद पोक्षेंनी छावा पाहिल्यानंतर का केली खंत व्यक्त?

छावा चित्रपटाने बॅाक्स अॅाफिसवर अनेक चित्रपटांचे रेकॅार्ड मोडले आहेत. अजूनही तिकीटबारीवर छावाची यशस्वी घोडदौड सुरूच आहे. या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्याची गाथा दाखविण्यात आली आहे. छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका अभिनेता विकी कौशलने साकारली आहे. त्याच्या भूमिकेचे कौतुक प्रेक्षकांकडून करण्यात येत आहे. इंडस्ट्रीमधील सेलिब्रेटींनी देखील छावाबद्दल आपली प्रतिक्रिया व्यक्त करत चित्रपटाचे कौतुक केले आहे. पण दुसरीकडे मात्र चित्रपटावरून वादही होताना दिसत आहे. अभिनेते शरद पोक्षेंनी छावाविषयी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी इन्स्टाग्रावर अकाउंटवरून पोस्ट शेअर केली आहे. तसेच एक व्हिडिओ देखील शेअर केली आहे.
संपूर्ण हिंदू समाज एकवटला असला तरी वादावादी सुरु झाल्यानंतर आपण संभाजी महाराजांवर औरंगजेबने केलेले अत्याचार हा मुद्दाच विसरल्याची खंत पोक्षें यांनी व्हिडिओमध्ये व्यक्त केली आहे. ‘छावा’ चित्रपट प्रदर्शित झाला आहे आणि सगळा हिंदू समाज, छत्रपती संभाजी महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर नितांत प्रेम करणारे सगळे अचानक एकवटले. आपण सगळे एकवटलो, चित्रपट खूप चालायला लागला आहे. मात्र या चित्रपटावरुन वाद-विवाद सुरू झाले. मग वंशजांनी आक्षेप घ्यायला सुरुवात केली. दोन्हीकडून वाद प्रतिवाद सुरू झाले. मारामारी सुरू झाली. भांडणं सुरू झाली. पण या सगळ्या भानगडीमध्ये एक गोष्ट राहूनच गेली. औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांवर अनन्वित अत्याचार करून जे हाल केले. म्हणजे क्रूरतेचं शेवटचं टोक गाठलं तो औरंग्या मात्र बाजूलाच राहिला, असल्याचे पोक्षें म्हणाले आहेत.
मराठा विरुद्ध ब्राह्मण समाज असं चित्र!
खरंतर सिनेमा बघितल्यानंतर जसं सध्या काही घडलं तर एखाद्या नेत्याच्या फोटोवर चप्पला वगैरे मारतात, थुंकतात, असे प्रकार घडतात. तसंच खरंतर औरंगजेबाच्या प्रतिमेवरती चप्पला मारायला हव्या होत्या. त्याचे पुतळे ठिकठिकाणी हिंदुस्थानमध्ये जाळले जातायत, असं चित्र दिसायला हवं होतं. दिसलं काय?, मराठा विरुद्ध ब्राह्मण समाज असं चित्र! मराठे म्हणणार, आमचे पूर्वज असे नव्हते. तुमच्या ब्राह्मणांनी छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांना मारलं. मग ब्राह्मण म्हणणार, आमच्याकडे दोन-चार होते. तुमच्या मराठ्यांनी छत्रपती शिवाजी आणि संभाजी महाराजांचं नुकसान केलं. ते जास्त गद्दार होते. मग मराठे म्हणणार, तुम्हीच सत्यानाश केलाय. नंतर ब्राह्मण म्हणणार, तुम्हीच सत्यानाश केला. या सगळ्या भानगडीत एक विसरून जातोय औरंग्या बाजूलाच राहितोय, असं पोक्षेंनी म्हटलं आहे. त्यांनी केलेल्या वक्तव्याची सर्वत्र मोठी चर्चा केली जात आहे.





