वर्षाच्या पहिल्याच दिवशी ‘या’ गावांना मिळालं गिफ्ट; स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच धावली लालपरी

गडचिरोली : स्वातंत्र्याच्या साडेसात दशकांनंतर गडचिरोलीतील गर्देवाडा ते वांगेतुरी मार्गावरील जवळपास 15 गावांना पहिल्यांदाच बससेवा मिळाली आहे. विशेष म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते या बससेवेचे उद्घाटन झाले. उद्घाटनानंतर मुख्यमंत्र्यांनी स्वतः एसटी बसमधून गावकऱ्यांसोबत प्रवास केला.
गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात काही महिन्यांपूर्वीपर्यंत फक्त गर्देवाडा पर्यंतच बस जायची. कारण, यापुढे छत्तीसगड सीमेच्या दिशेने अनेक किलोमीटरपर्यंत महाराष्ट्राच्या भागात पक्के रस्ते आणि पुल नव्हते. या भागात माओवाद्यांची हुकूमत चालत होती, दोन वर्षांपूर्वी गडचिरोली पोलिसांनी माओवाद्यांचा बालेकिल्ला असलेल्या या भागात आपला डॉमिनन्स वाढवण सुरू केलं. एका नंतर एक पोलीस मदत केंद्रांची उभारणी झाली. सार्वजनिक बांधकाम विभागानेही हिम्मत करत गट्टा ते वांगेतुरी दरम्यान 32 किलोमीटरचा रस्ता निर्माण केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वांगेतुरी-गर्देवाडा-गट्टा-अहेरी बससेवेचा शुभारंभ केला. या भागात पोहोचणारे श्री. फडणवीस हे महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिलेच मुख्यमंत्री आहेत. पहिल्यांदाच या भागात पक्क्या रस्त्याचे बांधकाम झाले, पहिल्यांदाच या भागात बससेवा सुरु झाली. या… pic.twitter.com/9Wxt996Q7k
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) January 1, 2025
विशेष म्हणजे शासन व प्रशासकीय पातळीवर झालेल्या या प्रयोगाचे फलित म्हणजे स्वातंत्र्याच्या 76 वर्षानंतर इथं लालपरी धावली आहे. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच आज गर्देवाडाच्या पुढे महाराष्ट्र छत्तीसगड सीमेपर्यंत म्हणजेच वांगेतुरीपर्यंत बससेवा सुरू झाल्याने येथील ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे.
11 नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण –
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसमोर गडचिरोलीत 11 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. यात 8 महिला आणि 3 पुरूषांचा समावेश आहे. ते मागील 38 वर्षांपासून नक्षलवादी कारवायांशी जोडले गेले होते. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांच्या पुर्नवसनासाठी लाखोंची रक्कम देण्यात येणार आहे. तसेच या रकमेत अतिरिक्त 10 लाख रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यांनी केली आहे. आत्मसमर्पन केलेल्या जहाल नक्षलींमध्ये 38 वर्ष नक्षली चळवळ चालवणारी ताराअक्का यांचाही समावेश आहे.





