सौरव गांगुलीच्या मुलीचा अपघात, बसने कारला दिली धडक

Sourav Ganguly’s Daughter’s Accident : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या मुलीचा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत सौरव गांगुलीची मुलगी सना थोडक्यात बचावली. सना कारमधून प्रवास करत असताना, मागून येणाऱ्या बसने गाडीला जोरदार धडकली दिली.
हा अपघात कोलकत्त्यातील डायमंड हार्बर रोडवर शुक्रवारी (3 जानेवारी) झाला. अपघाताची जागा गांगुलीच्या घरापासून जवळच आहे. या अपघातात कारचे नुकसान झाले आहे. मात्र, सुदैवाने कोणतीही व्यक्ती जखमी झालेली नाही.
सना गांगुली कारमध्ये ड्रायव्हरच्या बाजूला पुढे बसली होती. सनासह कारचा ड्रायव्हर पूर्णपणे सुरक्षित आहे. या घटनेनंतर बस ड्रायव्हरने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी गाडीला धडक देणाऱ्या बसचा पाठलाग करत ड्रायव्हरला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिसांनी बस ड्रायव्हरला ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, सनाबद्दल सांगायचे तर ती सौरव गांगुली आणि त्याची पत्नी डोना यांची एकुलती एक मुलगी आहे. तिने कोलकत्त्यातील लोरेटो हाऊसमधून सुरुवातीचे शिक्षण घेतले. त्यानंतर यूनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमधून अर्थशास्त्रात पदवी घेतली. सध्या ती बुटीक कन्सल्टिंग फर्म INNOVERV मध्ये कन्सल्टंट म्हणून काम करत आहे.





