रक्षाबंधनासाठी घरी जाणाऱ्या मजुरांच्या पिकअपला बसची धडक; 10 जण ठार, 25 जखमी

UP Bulandshahr Accident | उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यातील सलेमपूर येथे मोठा अपघात झाला आहे. रक्षाबंधन साजरी करण्यासाठी घरी जाणाऱ्या मजुरांच्या पिकअपला बसने धडक दिली. या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक मुलांसह 25 हून अधिक मजूर जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे.
गाझियाबादमधील एका ब्रेड कंपनीत काम करणारे ३५ हून अधिक मजूर रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यासाठी गाझियाबादहून पिकअपमधून अलीगढ जिल्ह्यातील अत्रौली तहसीलमधील रायपूर गावात जात होते. ते सलेमपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येताच भरधाव बसने पिकअपला धडक दिली. यात काही लोकांचा जागीच मृत्यू झाला. तर अनेक जखमींचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
25 हून अधिक जखमींवर जिल्हा रुग्णालय आणि जेपी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दहा जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील सात जणांचा समावेश आहे. दोन जण सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे. तर एकाची ओळख पटलेली नाही.
अपघाताची माहिती मृतांच्या नातेवाईकांना आणि स्थानिकांना समजताच तेही घटनास्थळी पोहोचले. यावेळी संतप्त लोकांनी रास्ता रोको केला. मात्र, पोलिसांनी त्यांची समजूत घालत प्रकरण शांत केले आणि वाहतूक कोंडी मिटवली. त्याचवेळी घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती.UP Bulandshahr Accident |
हेही वाचा :
वाहन चालवताना चालकाला गाडीतच हृदयविकाराचा झटका ; अपघातात दोघांचा मृत्यू





