Uttarakhand : उत्तराखंडमध्ये बस दरीत कोसळली; ९ जणांचा मृत्यू, २५ जखमी
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी रूग्णालयाला भेट देऊन जखमींच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यांनी अपघातातील जीवितहानीबद्दल दु:ख व्यक्त केले.

Uttarakhand – उत्तराखंडमध्ये मंगळवारी पहाटे एक प्रवासी बस खोल दरीत कोसळली. त्या भीषण अपघातात बस चालकासह ९ जण मृत्युमुखी पडले. तर, २५ जण जखमी झाले. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
सोमवारची मध्यरात्र उलटल्यानंतर ३.१५ वाजण्याच्या सुमारास संबंधित बस हरिद्वारहून जोशीमठकडे निघाली. त्या बसचा पहाटे ४.५० वाजण्याच्या सुमारास टिहरी गढवाल जिल्ह्यात अपघात झाला.
रस्त्यालगतचे लोखंडी कठडे तोडून बस १०० मीटर खोल दरीत कोसळली. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर तातडीने मदत आणि बचाव कार्य हाती घेण्यात आले. त्यामध्ये आपत्ती प्रतिसाद दल, पोलीस आणि अग्निशमन दल सहभागी झाले.
अपघातग्रस्त बसमधून चालकासह ३४ जण प्रवास करत होते. जखमी झालेल्या २५ प्रवाशांना उपचारासाठी एम्स ऋषिकेश रूग्णालयात हलवण्यात आले.
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी रूग्णालयाला भेट देऊन जखमींच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यांनी अपघातातील जीवितहानीबद्दल दु:ख व्यक्त केले.






