पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरातील मोशी येथून तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी गेलेली खासगी बस बुधवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास तुळजापूर घाटात उलटली. या घटनेत एका महिला भाविकेचा मृत्यू झाला असून, ४५ भाविक जखमी झाले आहेत. यातील १८ जण गंभीर असल्याने त्यांना धाराशिवच्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे. बसमधील सर्व भाविक मोशी व डूडुळगाव येथील रहिवासी आहेत. अपघातातील एका जखमीने दिलेल्या माहितीनुसार मोशी येथील ४६ भाविकांना घेऊन एक खासगी ट्रॅव्हल्स बुधवारी सकाळी ६ वाजता मोशीतून तुळजापूरकडे रवाना झाली. दर्शन करुन सर्व भाविक त्याच बसने मोशीकडे येण्यासाठी सायंकाळी ६ वाजता परतीच्या प्रवासाला लागले. मात्र, तुळजापूर शहराला लागूनच असलेल्या घाटातील एका वळणावर ही बस रस्त्यावरच उलटली. घटनेची माहिती कळताच पोलिसांनी तसेच तुळजापूर शहरातील नागरिकांनी याठिकाणी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात दाखल केले. या घटनेत मोशी येथील महिला भाविकाचा मृत्यू झाला आहे. तर इतर ४५ भाविक जखमी झाले आहेत. बसमधील सर्व भाविक मोशी व डूडुळगाव येथील रहिवासी आहेत. भाजप कार्यकर्त्यांचा उपक्रम अपघातग्रस्त बसमध्ये तसेच काही जखमींकडे दर्शनाचे पास आढळून आले आहेत. त्यावर आयोजक म्हणून मोशी येथील सामाजिक कार्यकर्त्या सरिता तळेकर व योगेश तळेकर यांची फोटोसह नावे आहेत. शिवाय, पासवर भाजपचे कमळ चिन्हही छापले आहे. भोसरीतून डॉक्टरांचे पथकही रवाना काही लोकप्रतिनिधींनी धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याशी संपर्क केला असून, मदतकार्य सुरू झाले असल्याचे सांगण्यात आले. तसेच भोसरी येथून काही कार्यकर्ते घटनास्थळी जाण्यासाठी बुधवारी संध्याकाळी निघाले. यामध्ये कार्यकर्त्यांसह डॉक्टरांचे एक पथक देखील सोबत होते.