Bus Accident : सारोळे उड्डाणपुलाजवळ बसचा भीषण अपघात; ३० ते ४० प्रवाशांचे प्राण थोडक्यात बचावले
Bus Accident : सातारा परिसरात चालक बदलल्यानंतर काही वेळातच दुर्घटना; मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवल्याचा प्रवाशांचा आरोप, चालक फरार.

Bus Accident – सातारा-पुणे महामार्गावरील सारोळे उड्डाणपुलाजवळ सोमवारी (दि. १) पहाटे एक मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. बेंगळुरूहून मुंबईकडे प्रवास करणाऱ्या प्रवासी बसचा अपघात झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. बसमध्ये सुमारे 30 ते 40 प्रवासी प्रवास करत होते. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित बस बेंगळुरूहून मुंबईच्या दिशेने जात होती. सातारा परिसरात आल्यानंतर बसचा चालक बदलण्यात आला होता. त्यानंतर काही अंतर पार केल्यानंतर सारोळे उड्डाणपुलाजवळ बसचा अपघात झाला. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी काही प्रवाशांनी चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप केला आहे. अपघातानंतर चालकाने घटनास्थळावरून पळ काढल्याची माहिती समोर आली असून त्यामुळे संशय अधिक बळावला आहे.
चालकाच्या वर्तनामुळे संतप्त झालेल्या प्रवाशांनी संबंधित यंत्रणांकडे चौकशीची मागणी केली आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, महामार्ग सुरक्षा यंत्रणा आणि संबंधित अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तत्काळ मदतकार्य सुरू करून प्रवाशांना सुरक्षितस्थळी हलविले. अपघातग्रस्त बसचे नुकसान झाले असून महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.
मात्र प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून वाहतूक सुरळीत केली. या प्रकरणी चालकाची ओळख, त्याची वैद्यकीय तपासणी, तसेच अपघाताचे नेमके कारण याबाबत संबंधित यंत्रणांकडून तपास सुरू करण्यात आला आहे. चालक खरोखर मद्यधुंद अवस्थेत होता का, तांत्रिक बिघाडामुळे अपघात झाला की इतर काही कारण होते, याचा उलगडा तपासानंतर होणार आहे.


