Pune crime news : पुण्यात गुन्हे शाखेचा दणका! २५ हून अधिक गुन्हे असलेला घरफोडी बहाद्दर गजाआड; ५ लाखांचे सोने जप्त
Pune crime news : पुणे गुन्हे शाखा युनिट-२ ने मांजरी येथील सराईत गुन्हेगार अर्जुनसिंग दुधानी याला अटक केली आहे.

Pune crime news : मार्केटयार्ड आणि बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दाखल असलेल्या घरफोडी प्रकरणांचा छडा लावत गुन्हे शाखा युनिट-२ ने सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. अर्जुनसिंग रजपुतसिंग दुधानी (४८, रा. बहात्तर वस्ती, मांजरी, ता. हवेली) असे आरोपीचे नाव आहे.
रामनवमीच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्तावर असताना गुन्हे शाखा युनिट-२ च्या पथकाला माहिती मिळाली की, घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार बैल बाजार मार्केटयार्ड परिसरातून जाणार आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान आरोपीने मार्केटयार्ड तसेच बिबवेवाडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दोन घरफोडीच्या गुन्ह्यांची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून सुमारे ५ लाख ४० हजार रुपये किमतीचे ४५ ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी २५ पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. अटकेनंतर त्याला पुढील कारवाईसाठी मार्केटयार्ड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंकज देशमुख, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) निखील पिंगळे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे-१) शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित जाधव यांच्या सूचनांनुसार करण्यात आली.
या पथकात सहायक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ तसेच पोलीस अंमलदार संजय जाधव, उज्वल मोकाशी, संतोष टकले, विनोद चव्हाण, ओंकार कुंभार, योगेश मांढरे, शंकर कुंभार, विजयकुमार पवार, विशाल दळवी, शंकर नेवसे आणि ऋषिकेश व्यवहारे यांनी सहभाग घेतला.





