बुंदेसलीगा फुटबॉल : किमिचचा निर्णायक गोल, बायर्नचा विजय

यंदाच्या मोसमातही विजेतेपदाची बायर्नला संधी
बर्लिन – जोयुया किमिचने केलेल्या महत्त्वपूर्ण गोलच्या जोरावर बायर्न म्युनिक संघाने बुंदेसलीगा फुटबॉल स्पर्धेत बोर्सुया डॉर्टमंड संघाचा 1-0 असा पराभव केला. या विजयाच्या जोरावर बायर्न संघाने स्पर्धेच्या गुणतालिकेत अव्वल स्थान कायम राखले आहे.
गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या डॉर्टमंड संघाने अत्यंत सरस खेळ केला. त्यांचा बचाव देखील अफलातून होत होता. मात्र, सामन्याच्या 43 व्या मिनिटाला किमिचने त्यांचा बचाव भेदला व अप्रतिम पासवर गोल केला. हा सामना डॉर्टमंडच्या घरच्या मैदानावर सिग्रल पार्क मैदानावर खेळविण्यात आला. मात्र, त्याचा कोणताही लाभ त्यांच्या संघाला मिळाला नाही.
सुरुवातीला भक्कम बचाव करत असलेल्या डॉर्टमंडला किमिचला रोखण्यात अपयश आले. किमिचने या स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. या स्पर्धेत त्याने एकूण तीन गोल केले असले तरीही हे सर्व गोल संघाच्या विजयात मोलाचे ठरले आहेत. या सामन्यातील विजयाने बायर्नने सात गुणांची आघाडी घेत स्पर्धेच्या विजेतेपदाची संधी निर्माण केली आहे.
करोनाचा धोका वाढल्याने ही स्पर्धा काही सामने झाल्यानंतर स्थगित करण्यात आली होती. जर्मनीत करोनाचा धोका कमी झाल्याने ही स्पर्धा पुन्हा सुरू करण्याची परवानगी देण्यात आल्याने खेळाडूंना मैदानावर परतता आले. या स्पर्धेला सुरुवात झाल्याने युरोपातील इपीएल, ला लीगा तसेच अन्य मानाच्या स्पर्धा देखील पुन्हा सुरू होतील, अशी शक्यता निर्माण झाली आहे. अर्थात, इपीएलबाबत अद्याप निर्णय झालेला नसला तरीही पुढील काळात परिस्थितीचा आढावा घेतल्यावर जून महिन्यापासून विविध स्पर्धांबाबत निर्णय घेतला जाणार आहे.





