Devendra Fadnavis : २०२६ मध्ये बंपर सरकारी नोकऱ्या; सेवा प्रवेश नियमांत सुधारणा, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

मुंबई : राज्य शासनाच्या प्रत्येक संवर्गातील पदे आणि त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये कालानुरूप मोठ्या प्रमाणात बदल झालेला आहे, हे लक्षात घेऊन राज्यातील सर्व संवर्गातील पदांच्या सेवा प्रवेश नियमात सुधारणा करण्यात येणार आहे, असे सांगून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पदभरती प्रक्रिया गतीशील करून २०२६ या वर्षात मोठ्या प्रमाणात पदभरती करण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जाहीर केले.
शासकीय सेवेत आज नियुक्त झालेल्या सर्व उमेदवारांनी लोकाभिमुख आणि पारदर्शी पद्धतीने आपले काम करावे असे आवाहनही फडणवीस यांनी केले आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे सामान्य प्रशासन विभागातर्फे अनुकंपा तत्वावरील व लिपिक श्रेणीतील १० हजार ३०९ उमेदवारांना नियुक्तीपत्र वितरणाच्या राज्य रोजगार मेळाव्याच्या राज्यस्तरीय कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते.
राज्य शासन अधिक सक्षम आणि गतिशील करण्यासाठी शासनाने सेवा प्रवेश नियमांमध्ये सुधारणा, अनुकंपा तत्त्वावरील प्रलंबित प्रकरणांचे निराकरण तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पारदर्शक भरती प्रक्रिया राबविण्यावर भर दिला आहे.
आयोगाची पदभरती प्रक्रिया गतीशील करण्यासाठी अपर मुख्य सचिव सामान्य प्रशासन यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून विविध राज्यांचा अभ्यास करून निर्णय घेणार आहोत. आतापर्यंत ८० टक्के अनुकंपा नियुक्त्या पूर्ण झाल्या आहेत. उर्वरित प्रकरणे लवकरच निकाली काढण्यात येतील.
अनेक विभागांचे सेवा प्रवेश नियम ५० वर्षे जुने होते. रिक्त पदे भरण्यासाठी हे सेवा प्रवेश नियम बदलण्याचा प्रयत्न सुरू केला.अनुकंपा तत्त्वावरील नियुक्त्या मोठ्या प्रमाणावर प्रलंबित होत्या, अनेक पात्र कुटुंबे, ज्यात सरकारी कर्मचाऱ्यांची मुले आणि पत्नी यांचा समावेश होता. याबाबतचे सर्व शासन निर्णय बदलून एक सुटसुटीत आणि सोपा शासन निर्णय तयार केला.
अनुकंपा तत्वावर नोकरी देणे हे काही उपकार नाहीत, तर ती शासनाची जबाबदारी आहे. कर्मचाऱ्यांच्या घरी एखादा अपघात झाल्यास, त्यांच्या कुटुंबाची काळजी घेणे हे सरकारचे कर्तव्य आहे, या भावनेतून आम्ही काम केले. लिपिक संवर्गातील नियुक्त्याही एमपीएससीमार्फत करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील काळात सेवा प्रवेश नियमांमध्ये सुधारणा करून आणि भरती प्रक्रियेची गती वाढवून नियुक्त्या दिल्या जातील.
आपण सेवा करण्याकरता येथे आलेलो आहोत. हा सेवाभाव तुम्ही कायम ठेवल्यास, सरकारी सेवेत काम करताना मिळणारे मानसिक समाधान कोणत्याही पैशाशी तुलना न करता येणारे समाधान असेल असेही मुख्यमंत्री म्हणाले. पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रत्येक जिल्ह्यात नियुक्ती पत्राचे वाटप करण्यात आले. राज्य शासनात नियुक्त होणाऱ्या एकूण 10,309 उमेदवारांपैकी सर्वाधिक 3,078 उमेदवार हे कोकण विभागातील असून, 2,597 हे विदर्भातील आहेत. पुणे विभागात 1,674, नाशिक विभागात 1,250, तर मराठवाड्यातील 1,710 उमेदवार आहेत.
अनुष्का प्रकाश मोरेला नियुक्ती
अनुकंपा यादीत आज शहीद उपनिरीक्षक प्रकाश पांडुरंग मोरे यांची कन्या अनुष्का प्रकाश मोरे हिला नियुक्ती दिली आहे. २६/११/२००८ च्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या अधिकाऱ्याच्या मुलीला इतक्या वर्षांनी न्याय देऊ शकलो, हे महत्त्वाचे आहे. अनुष्का बी-फार्म असल्याने तिला औषध निर्माता गट ब हे पद अनुकंपावर मिळणे नियमांमुळे कठीण होते, कारण ते पद एमपीएससीकडे होते. पण, आम्ही एमपीएससीला विशेष विनंती करून नियमात शिथिलता मिळवली आणि तिला न्याय दिला. अनुष्काला न्याय मिळवून दिल्याचा आम्हाला आनंद आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.





