Nagar | गोंदवलेमध्ये अटी व शर्तींच्या पूर्ततेशिवाय बैलगाडा शर्यति

गोंदवले, (वार्ताहर) – श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त गोंदवले खुर्द, ता. माण येथे बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यात आले. आयोजकांनी प्रशासकीय परवानग्यांची कागदोपत्री पूर्तता केली
परंतु त्यातील अटी आणि शर्तींची पूर्तता न करताच या शर्यती झाल्या. या शर्यतींना परवानगी दिलेल्या प्रशासकीय अधिकार्यांनाच अटी व शर्तींच्या पूर्ततेचा विसर पडल्याची चर्चा सुरू होती.
शर्यतीत धावणार्या बैलांचे आरोग्य व्यवस्थित आहे का? बैल शर्यतीत पळण्यासाठी पात्र आहेत का, यासाठी पशुवैद्यकीय अधिकार्यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक असते.
मात्र, शर्यतींच्या ठिकाणी पशुवैद्यकीय औषधोपचार सेवा देणारी यंत्रणा हजर नव्हती. बैलगाडा शर्यतींवेळी मानवी आरोग्य विषयक त्रुटी राहू नये, म्हणून रुग्णवाहिका, वैद्यकीय अधिकारी आणि इतर यंत्रणा अनिवार्य असते.
मात्र, त्या ठिकाणी रुग्णवाहिका, वैद्यकीय अधिकारी उपस्थित नव्हते. पोलिसांनीही नाहरकत प्रमाणपत्र दिले असले, तरी तेथे पोलीस अधिकारी वा कर्मचारी उपस्थित नव्हता. एकंदरीत शर्यतींच्या आयोजनाला परवानगी देणारे अधिकारीच अटी आणि शर्तींची पूर्तता होते की नाही, हे पाहायला जणू विसरुनच गेले होते.
या बैलगाडा शर्यतींना परवानगी देणार्या प्रांताधिकार्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी फोन घेतला नाही. त्यामुळे आयोजकांकडून अटी व शर्तींची पूर्तता न झाल्याने प्रशासकीय अधिकारी त्यांच्यावर कोणती कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




