सराफाला लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

सातारा – येथील शाहूपुरी सराफ आणि त्याच्या कर्मचाऱ्याला कोयत्याचा धाक दाखवून बॅग हिसकावणाऱ्या टोळीचा पर्दाफाश शाहूपुरी पोलिसांनी केला आहेत. संशयितांमध्ये अल्पवयीन बालकासह पाच जांचा समावेश आहे. त्यांच्याकडून पिस्तूल, कोयता जप्त करण्यात आला आहे. अर्जुन दौलत पवार, अर्जुन कुंदन इंगळे, रोहित शिवाजी जाधव (रा. सैदापूर, ता. सातारा), विकास बाळासाहेब गोसावी (रा. गोसावी गल्ली, सांगली) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
याबाबत माहिती अशी, ही घटना शाहूपुरी-दिव्यनगरी रस्त्यावर हिंदवी पब्लिक स्कूलच्या कोपऱ्याजवळ 19 मार्चला रात्री 9.30 च्या सुमारास घडली होती. साताऱ्यातील एक सराफी व्यावसायिक व त्याच्या कर्मचाऱ्याला संशयितांनी इंडिका कार आडवी मारुन थांबवले होते. संशयितांनी सराफाला चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडील बॅग हिसकावून घेतली होती. सुदैवाने बॅगेत किमती ऐवज नव्हता. या झटापटीनंतर संशयितांनी पलायन केले होते. या थरारक घटनेनंतर शाहूपुरी पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. यामुळे परिसरातील नागरिक व सराफांमध्ये भीतीचे वातावरण होते. गेले दहा दिवस पोलीस खबऱ्यांच्या माध्यमातून आणि तंत्रज्ञानाच्या आधारे संशयितांचा शोध घेत असताना, संशयितांची माहिती मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी संशयितांना जेरबंद केले. संशयितांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. संशयितांपैकी एक जण रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. संशयितांनी पिस्तुलाचाही वापर केल्याचे तपासामध्ये स्पष्ट झाले. पोलिसांनी संशयितांकडून पिस्तूल, कोयता, कार व मोबाइल, असा दोन लाख 83 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. संशयितांना न्यायालयात हजर करण्यात आले असता, त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली. संशयितापैकी एकावर दरोडा व चोरीचे गुन्हे दाखल आहेत. तो मेढा पोलिसांना “वॉन्टेड’ होता. पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय पतंगे, सपोनि प्रशांत बधे, फौजदार अश्विनी वाघमारे, हवालदार लैलेश फडतरे, सचिन माने, धनंजय कुंभार, अमित माने, स्वप्निल कुंभार, संतोष इष्टे, मिथुन मोरे यांनी ही कारवाई केली.





