Satish Bhosale : खोक्याचं कुटुंब रस्त्यावर? घरावर बुलडोजर फिरवला; सतीश भोसलेला वनविभागाचा मोठा दणका

बीड : आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश भोसले उर्फ खोक्याच्या बेकायदा घरावर वनविभागाने बुलडोझर फिरवला आहे. वनविभागाने ही बेधडक कारवाई करून खोक्याचा माज उतरवला आहे. शिरूर कासारपासून काही अंतरावर सतीश भोसले याचं घर आहे. बुलडोजर फिरवण्याआधी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याच्या घराची झडती घेतली होती.
त्याच्या घरातील सामान बाहेर काढले. त्यानंतर त्याच्या बेकायदेशीर घरावर बुलडोझर चालवण्यात आला. सतीश भोसले उर्फ खोक्याचे घर वन विभागाच्या जमिनीवर अधिकृतपणे असल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. यावेळी वन विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत पोलिसही उपस्थित होते.
विभागाचा मोठा दणका
ढाकणे पिता-पुत्राला मारहाण, पैशांची उधळण करतानाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर सतीश भोसले उर्फ खोक्या हा चर्चेत आला होता. त्याच्यावर मागील 20 दिवसांत तीन गुन्हे दाखल झाले आहेत. तेव्हापासून तो फरार झाला होता. पोलिसांनी काल त्याला प्रयागराज येथून अटक केली होती. मात्र, तो बीडमध्ये येण्याआधीच त्याला वन विभागाने मोठा दणका दिला आहे.
काही दिवसांपूर्वी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सतीश भोसलेच्या घराची झाडाझडती घेतली होती. या कारवाईत खोक्याच्या घरात शिकारीसाठी लागणारे साहित्य, प्राण्यांचे मांस सापडले होते. त्यानंतर त्याच्यावर वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत पहिला गुन्हा दाखल झाला होता. तसेच वन विभागाच्या जमिनीवर घर बांधल्याने दुसरा गुन्हा शिरुर कासार पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. वन विभागाने खोक्याला घरासंदर्भात नोटीसही पाठवली होती. परंतु, 48 तास उलटूनही नोटीसीला उत्तर न आल्याने आता वन विभागाकडून कारवाई करण्यात आली आहे.
खोक्या बीड जिल्ह्यातून हद्दपार
खोक्यावर शिरुर कासार, पाटोदा, अंमळनेर पोलिस ठाण्यात यापूर्वीही गुन्हे नोंद होते. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या खोक्या भोसलेवर हद्दपारीची कारवाई करण्याबाबत पोलिसांनी त्याच्यावर हद्दपारीचा प्रस्ताव उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सादर केला होता. बीडच्या उपविभागीय अधिकारी कविता जाधव यांनी या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. सतीश भोसले उर्फ खोक्याची बीड जिल्ह्यातून हद्दपारी करण्यात आली आहे. याबाबचे पत्र शिरुर कासार पोलिसांना देण्यात आले. त्यामुळे, उत्तर प्रदेशच्या दिशेने पळून गेलेला खोक्या आता बीड जिल्ह्यातून हद्दपार असणार आहे.
कोण आहे सतीश भोसले?
सतीश भोसले हा मागील पाच वर्षापासून राजकारणात सक्रिय असून तो शिरूर कासार तालुक्यातील झापेवाडीचा रहिवासी आहे. त्याच्याकडे भाजपच्या महाराष्ट्र भटके विमुक्त आघाडीचे पद होते. सामाजिक कार्यातून ओळख निर्माण केली आहे. तसेच पारधी समाजासाठी सामाजिक कार्य केले.अलीकडच्या काळात सुरेश धस यांच्याशी संपर्क आल्याने जवळीक वाढली. सुरेश धस यांचा कार्यकर्ता असल्याची ओळख निर्माण झाल्याने परिसरात दबदबा निर्माण झाला आहे.





