मंदिर व्यवस्थापनातील कामगारांकडून 10 वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार; आरोपीचे घर बुलडोझरने केले जमीनदोस्त

मध्य प्रदेशातील मैहरमध्ये अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या प्रकरणात कठोरता दाखवत राज्याचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या आदेशानुसार आरोपीच्या घरावर बुलडोझर चालवण्यात आला आहे. आरोपी रवींद्र चौधरीचे उदयपूर येथील घर फोडण्यात आले आहे, तर मालियन टोला येथील अतुल बधौलियाच्या घरावरही बुलडोझर कारवाई करण्यात आली आहे.
मैहर प्रशासनाने शनिवारी सकाळीच आरोपीच्या घरावर बुलडोझर चालवण्याची कारवाई केली. कारवाईदरम्यान एसडीएम सुरेश जाधव, एसडीओपी लोकेश दावर यांच्यासह मोठ्या संख्येने पोलीस कर्मचारी उपस्थित होते. दोन आरोपींनी 10 वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार केला. येथील मुलीवर सध्या रेवा मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही आरोपी मंदिर व्यवस्थापनात रोजंदारीवर काम करतात. गुरुवारी दुपारी दोन वाजता दोघांनी मुलीला फुस लावून शारदा माता मंदिराजवळील डोंगरावर नेले. याठिकाणी तिच्यावर दोघांकडून बलात्कार करण्यात आला आणि तिला मारहाणही करण्यात आली. रक्तबंबाळ झालेल्या निष्पाप मुलीला तिच्या नातेवाईकांनी रुग्णालयात दाखल केले.
आरोपींना 14 दिवसांची कोठडी –
एसडीओपी लोकेश दावर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीच्या शरीरावर चाव्याच्या अनेक खुणा आहेत. मुलीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये काठी टाकल्याची बाबही समोर आली आहे. तथापि, वैद्यकीय तपासणीनंतरच याची पुष्टी होऊ शकते. रवींद्रकुमार रवी आणि अतुल भडोलिया अशी आरोपींची नावे आहेत. दोघांचे वय 30 वर्षे आहे. दोघांना शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता, तेथून त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
या घटनेनंतर मंदिर व्यवस्थापनाने दोघांनाही नोकरीवरून बडतर्फ केले आहे. आरोपींमुळे मंदिराची प्रतिमा मलीन झाली आहे, असे निवेदन मंदिर व्यवस्थापनाने जारी केले आहे. या घटनेनंतर नातेवाईकांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एकच गोंधळ घातला. आरोपींपैकी एक मंदिर समितीच्या गोशाळेचा सुरक्षा रक्षक आहे, तर दुसरा वेदशाळेत शिपाई आहे.





