पुणे जिल्हा | आज बेल्ह्याचा बैल व शेळी बाजार बंद

बेल्हे, (वार्ताहर)- गोवंश जनावरांची कत्तल रोखण्यासाठी पुणे जिल्ह्यातील बेल्हे येथील सोमवार (दि. १७) रोजी बैल व शेळी बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी दिला आहे. भाजीपाला बाजार सुरळीत चालू राहणार असल्याची माहिती बेल्हे बाजार प्रमुख शैलेश नाईकवाडी यांनी दिली.
पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी प्रस्ताव सादर करुन पुणे ग्रामीण जिल्हयात (दि.१७) बकरी ईद हा सण साजरा केला जाणार आहे. महाराष्ट्रामध्ये प्राणी संरक्षण कायदयानुसार दुध देणाऱ्या गायी, म्हैस, बैल, रेडा, पारडी, वळु अशा गोवंश जनावरांची कत्तल व त्यांचे मांस वाहतूक करण्यास बंदी आहे.
बकरी ईद सणाचे कत्तलसाठी जनावरांची मोठ्या प्रमाणात सोलापूर रोड, अहमदनगर रोड, सासवड रोड व नाशिक रोडने वाहतूक होऊन वाहतुकीस काही संघटनांकडून विरोध होऊन अटकाव होण्याची आणि त्याप्रसंगी सदर ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यासाठी बकरी ईदचे दिवशी गोवंश जनावरांची कत्तल रोखण्यासाठी पुणे जिल्हयातील जुन्नर तालुक्यातील बेल्हे येथील जनावरांचा बाजार बंद ठेवण्याबाबत विनंती केलेली आहे.





