पुणे जिल्हा | लाडक्या सर्जा राजाला सजवटीसाठी लगबग

नीरा, (वार्ताहर) – शेतकरी आणि बैल यांच्यातील जिव्हाळ्याचे नाते वृद्धिंगत करणारा कर्नाटकी (आषाढी) बेंदूर शुक्रवारी (दि. 19) नीरा आणि परिसरामध्ये साजरा होतो आहे. त्या पार्श्वभूमीवर नीरा बाजारात बैलांच्या मातीच्या मूर्ती आणि बैलांच्या सजावटीचे साहित्य खरेदीसाठी लोकांनी मोठी गर्दी केली आहे.
सध्या यांत्रिक शेतीचा जमाना आहे. मात्र तरी देखील काही शेतकर्यांच्या गोठ्यामध्ये अजूनही बैल पाहायला मिळतात. या बैलांच्या सजावटीसाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी गुरुवारी (दि. 18) नीरा बाजारामध्ये शेतकर्यांनी मोठी गर्दी केली होती. बैलांना लागणारे कासरे, मोरक्या, रंग त्याचबरोबर बैलांचे बाशिंग झुल आदी साहित्य खरेदीसाठी शेतकर्यांनी बाजारात गर्दी केली होती.
तर ज्या लोकांकडे बैल नाही. मात्र आपल्या पूर्वजांन बरोबर शेतात मेहनत करणार्या या बैलाच्या ऋणातून उतराई होण्यासाठी बैलाच्या मातीची मूर्तीची पूजा करण्याची परंपरा काही लोकांनी सुरू केली असून या मातीच्या मूर्ती कुंभाराकडून खरेदी करण्यासाठी नीरा बाजारात शेतकर्यांनी गर्दी केली होती.
नीरा येथील बाजारामध्ये अनेक बैलांच्या मूर्ती विक्रीसाठी आल्या होत्या 30 पासून ते 300 रुपयांपर्यंतच्या मूर्ती या नीरा बाजारामध्ये विक्रीसाठी आल्या होत्या. नीरा येथील कुंभार व्यवसायिकांनी या मूर्ती नीरा बाजारामध्ये विक्रीसाठी ठेवल्या होत्या. सध्या लोकांकडे बैल नसल्यामुळे लोक मातीच्या मूर्तींची पूजा करतात, अशी माहिती विजय कुंभार यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
मागील वर्षीपेक्षा यावर्षी बैलांच्या सजावटीच्या साहित्याची किंमत 10 ते 12 टक्क्यांनी वाढली आहे. शेतकर्याच्या दारात बैल जरी नसला तरी शेतकरी आपल्या गोठ्यात असलेल्या दुभत्या गायींची पूजा करत असतो.
त्यामुळे गायींच्या सजावटीसाठी शेतकरी आता वेगवेगळ्या साहित्य खरेदी करत असतो. तर सध्या बैलगाडा शर्यतीला खीलारी बैलाची मोठी मागणी वाढली आहे. त्यामुळे काही प्रमाणात का होईना देशी गो वंश टिकून आहे. – अक्षय कवितके, व्यापारी
ट्रॅक्टरच्या शेतीपेक्षा बैलांची शेती किफायतशीर असते. त्यामुळे आम्ही अजूनही दोन बैले पाळले आहेत. त्यांच्या सजावटीसाठी आम्ही सजावटीचे साहित्य खरेदी केले आहे. तर पूर्वी गावातून बैलांची मिरवणूक 10-10 तास चाललेली असायची. मात्र आता बैलांची संख्या कमी झाल्याने फारसी मिरवणूक काढली जात नाही.- लक्ष्मण बदडरे, शेतकरी, जेऊर





