सातारा – नियतीच्या बैलाला : सर्वांगसुंदर नाट्यप्रयोग

महाराष्ट्र शासन आयोजित 62 व्या हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेच्या आठव्या दिवशी सातारा उपकेंद्रावर शाहू कला अकादमी निर्मित, विजय तेंडुलकर लिखित आणि महेंद्र अंबवले दिग्दर्शित, सद्य राजकीय परिस्थितीवर प्रहसनात्मक भाष्य करणार्या नियतीच्या बैलाला’ या नाटकाचा प्रयोग सादर झाला. विजय तेंडुलकरांचे हे नाटक 1982 साली प्रकाशित झाले असले, तरी त्यातील राजकीय भाष्य आजही लागू पडते. या नाटकातून त्यांनी फँटसीच्या आधारे राजकारण्यांची टवाळी केली असली, तरी त्यामागे सामान्य माणसाच्या मनातील सुप्त असलेली चीड व्यक्त करणे, हा खरा हेतू आहे. स्वार्थी, संधिसाधू राजकारण्यांना या नाटकातून दिलेला इशारा आहे.
स्वार्थ साधण्यासाठी कोणत्याही पातळीवर जाण्याची राजकारण्यांची तयारी असते. सत्तेसाठी राजकारणी हवं ते करू शकतात; पण या सर्व घटनाची, गलिच्छपणाची नोंद नियती ठेवत असते. तीच नियती योग्य वेळी त्याचा बदला घेत असते. फक्त राजकारणीच राजकारण करत असतो, असे नाही, तर वेगवेगळ्या आघाड्यांवर, क्षेत्रांत राजकारण आपल्याला दिसून येतं. मग, ते कामाच्या ठिकाणी असू शकतं, प्रमोशन मिळवण्यासाठी केलेल्या क्लृप्त्या असोत, किंवा व्यवसायात पुढं जाण्यासाठी केलेल्या कुरघोड्या असोत. हे सगळं होत असलं, तरी एक दिवस असा येतो की, नियती सूड उगवते, तेव्हा राजाचा रंक होतो आणि तीच नियती ज्याच्या पाठीशी उभी राहते, तो रंक असला तरी त्याचा राजा होतो.
एक मुरब्बी राजकारणी आणि एक सामान्य अव्व्ल कारकून योगायोगाने एका बागेते भेटतात आणि त्यांच्यातील संवादातून नाट्यमय घडामोडी घडत जातात. मुख्यमंत्रिपदाचा राजकीय स्वार्थ साधण्यासाठी राजकारणी माणसाला सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून थोड्या अवधीकरिता दूर जायचे असते. कार्यकर्त्यांपासून लपण्यासाठी हा राजकारणी अव्वल कारकुनाला कपड्यांची अदलाबदल करायला भाग पडतो; परंतु त्याच वेळी कपड्यांसोबत चेहर्यांचीदेखील अदलाबदल होते आणि सुरू होते वेगळेच नाट्य. राजकारणी कारकून, तर कारकून राजकारणी बनतो. नेमकी त्यावेळी त्याच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडते. मुख्यमंत्री बनलेला कारकून राजकारणातले सगळे डावपेच शिकून अव्वल राजकारणी बनतो आणि राज्याची सर्व सूत्रे आपल्या हाती घेतो. बर्याच कालावधीनंतर ते दोघे पुन्हा त्याच बागेत योगायोगाने भेटतात आणि मूळचा राजकारणी चलाखी करून, कारकुनाला पुन्हा कपडे बदलायला भाग पाडतो. दोघेही मूळ स्वरूपात परतात. यावेळी पुन्हा नियतीचा खेळ पालटतो आणि मुखमंत्र्याला पदच्युत केल्याची घोषणा होते आणि सर्वसामान्य माणसाला, म्हणजेच मूळ रूपात परतलेल्या कारकुनाला मुख्यमंत्री करायचे ठरवले जाते.
विजय तेंडुलकरांचे हे दोन अंकी नाटक कालातीत आहे. हे नाटक आताच्या राजकीय परिस्थितीवर बेतल्याचे वाटते. अर्थातच ते कोणा व्यक्तीवर किंवा घटनेवर नाही, तर प्रवृत्तीवर केलेले भाष्य आहे. या दमदार संहितेला दिग्दर्शक महेंद्र अंबवलेने न्याय दिला. राजकारणी आणि कारकुनाची भूमिका करणार्या रोहित भोसले आणि शिवराज नाळे यांनीही प्रेक्षकांवर मजबूत पकड ठेवली. दोघांनी भूमिकेत झालेल्या अदलाबदलीनंतर एकमेकांचे पकडलेले बेअरिंग निव्वळ अप्रतिम. शेवटच्या पाच मिनिटांसाठी नियती’ म्हणजे सर्वसामान्य मतदार म्हणून आलेल्या चैतन्य पाटेकरचा अभिनय भाव खाऊन गेला. कार्यकर्ते म्हणून पूजा भोईटे, गार्गी हांगेकर, सई पोरे, ध्रुवी जंगम, विभावरी बाबर, केदार कुलकर्णी, महेंद्र अंबवले, अक्षय मोरे, अक्षय काळभोर यांनी छोट्या छोट्या भूमिका चांगल्या रितीने पार पडल्या.
दिग्दर्शन करताना अंबवले यांनी बारीकसारीक गोष्टींचा विचार केल्याचे जाणवले. तांत्रिक बाजूंमध्ये अनिकेत ओहोळ यांचे नेपथ्य सुंदर आणि कथेला अनुरूप होते. चैतन्य पाटेकरची प्रकाश व्यवस्था आणि नम्रता अंबवले यांची वेशभूषा उत्तम. श्रेयश पंडित, आविष्कार कांबळे, परिणिता, जीवन जंगम, मिथिलेश यांनी रंगमंच व्यवस्था सांभाळली. एकूणच हा प्रयोग सर्वांगसुंदर, परिपूर्ण झाला. शुक्रवार 1 डिसेंबर रोजी माणदेश सांस्कृतिक कला मंच या संस्थेच्या ‘सेल्फी’ या नाटकाचा प्रयोग होईल.
– नितीराज देशमाने





