युवासेनेची बांधणी करा – आढळराव पाटील

मंचर : शिरूर लोकसभा मतदारसंघातील युवासेनेच्या संघटनात्मक कामकाजाचा आढावा घेऊन आगामी काळात शाखा व महाविद्यालयीन स्तरापर्यंत युवासेनेची बांधणी करावी, असे आवाहन शिवसेना (शिंदे गट) उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केले.
बाळासाहेबांच्या शिवसेनेत कार्यरत असणाऱ्या शिरूर लोकसभा मतदारसंघातील सर्व युवासेना पदाधिकारी व युवासैनिक यांची महत्त्वपूर्ण बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना उपनेते, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तसेच युवासेना सचिव किरण साळी व युवासेना राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सचिन बांगर यांच्या प्रमुख उपस्थितीत लांडेवाडी (ता. आंबेगाव) येथे उत्साहात पार पडली.
यावेळी बापूसाहेब शिंदे यांच्यावर शिरूर-हवेली व हडपसर विधानसभा मतदारसंघ तसेच धनंजय पठारे यांच्यावर खेड-आळंदी व भोसरी विधानसभा मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रासाठी युवासेना जिल्हाप्रमुख म्हणून नेमणुकीचे पत्र आढळराव पाटील यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी शिरूर लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक विधानसभा क्षेत्रात विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन मेळावे घेण्याचे निहाय नियोजन करण्यात आले. यावेळी युवासेना पदाधिकारी व युवासैनिक उपस्थित होते.





