Satara: ‘स्वच्छता ही सेवा’ ची लोकचळवळ उभी करा; डॉ. प्रिया शिंदे
Satara

Satara: ‘स्वच्छता ही सेवा’ हा उपक्रम संस्काराचा भाग असून स्वच्छता आपली जीवनशैली बनावी या उद्देशाने जिल्ह्यात ‘स्वच्छता ही सेवा २०२६’ अभियान आजपासून (दि. १७) ते 2 ऑक्टोबर यादरम्यान तसेच सेवा संकल्प अभियान आजपासून ते १८ आॅक्टोबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या अभियानातून जिल्ह्यात स्वच्छतेची चळवळ उभी करा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सौ. प्रिया शिंदे यांनी केले आहे.
‘स्वच्छतेमध्ये सहभाग, स्वच्छ भारत, विकसित भारत’ या संकल्पनेनुसार लोकसहभाग, कचरा व्यवस्थापन आणि पर्यावरण संवर्धनावर या अभियानात विशेष भर देण्यात येणार आहे. सार्वजनिक व अस्वच्छ ठिकाणांची स्वच्छता, प्लॅस्टिक संकलन, पाण्याच्या स्रोतांची स्वच्छता, पर्यावरणपूरक गणपती विसर्जन, शाळा- महाविद्यालयांमध्ये स्वच्छता जनजागृती, विद्यार्थी व युवकांचा सहभाग तसेच घनकचरा व्यवस्थापन नियमांबाबत ग्रामस्थांचे प्रबोधन करण्यात येणार आहे. घराच्या पातळीवर ओला, सुका, सॅनिटरी व विशेष हाताळणी आवश्यक कचरा असे चार प्रकारे वर्गीकरण, कचरा कमी करणे, पुनर्वापर व कचऱ्यापासून मूल्यनिर्मिती याबाबतही जनजागृती केली जाणार असल्याचे डॉ. सौ. शिंदे यांनी सांगितले.
नागरिक, लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायती, शासकीय विभाग, स्वयंसेवी संस्था, महिला बचत गट, युवक, विद्यार्थी व सामाजिक संस्थांनी अभियानात सक्रिय सहभाग नोंदवून ‘चला, स्वच्छ साताऱ्यासाठी एकत्र येऊया!’ या संकल्पनेतून स्वच्छतेची लोकचळवळ उभी करावी. स्वच्छता मोहिमेत कचरा व्यवस्थापनावर भर देऊन जनजागृती करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजू भोसले यांनी दिली. स्वच्छता व्यवस्थेतील सफाई मित्रांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. त्यांची सुरक्षितता आणि सन्मानासाठी सफाई मित्र सुरक्षा व सन्मान शिबिरे होतील.स्वच्छतेसोबत पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण, ‘एक पेड माँ के नाम’, स्वच्छता पर्व आणि हरित पर्व यांसारखे उपक्रम राबविले जाणार आहेत, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजनयांनी दिली.
सामूहिक श्रमदान एक ऑक्टोबरला
अभियानातील महत्त्वाचा टप्पा म्हणून १ ऑक्टोबर रोजी देशव्यापी श्रमदान आयोजित करण्यात येणार आहे. ‘एक दिन, एक घंटा, एक साथ’ या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिकांनी स्वच्छतेसाठी श्रमदान करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. त्यानंतर दि. २ ऑक्टोबर रोजी स्वच्छ भारत दिवसानिमित्त विशेष ग्रामसभा आणि विविध स्वच्छता उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.





