Budhwar Peth Case – पुण्यातील बुधवार पेठेतील देहव्यापार प्रकरणात मुख्य संशयित असलेल्या बाबू भाई ऊर्फ पापा शेख या कथित बांगलादेशी नागरिकाचा शोध अद्याप लागलेला नसून, पुणे पोलिसांची शोधमोहीम निष्फळ ठरत आहे. पश्चिम बंगाल तसेच ईशान्येकडील राज्यांमध्ये छापेमारी करूनही पोलिसांच्या हाती कोणताही ठोस धागा लागलेला नाही. या प्रकरणातील त्याचा साथीदार संजय एस हाही सध्या फरार असून, दोघेही पोलिसांच्या रडारवर आहेत. फरासखाना पोलिसांनी १९ फेब्रुवारी रोजी बुधवार पेठेतील कुंटणखान्यावर टाकलेल्या छाप्यात ११ बांगलादेशी महिलांची सुटका केली होती. या कारवाईनंतर अनैतिक मानवी तस्करी प्रतिबंधक कायदा (पीटा) अंतर्गत चार वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून, या सर्व गुन्ह्यांमध्ये बाबू भाई आणि संजय एस यांना मुख्य आरोपी म्हणून नामनिर्देशित करण्यात आले आहे. बाबू भाईला नोव्हेंबर २०२४ मध्ये अटक करण्यात आली होती. मात्र, जानेवारी २०२५ मध्ये येरवडा कारागृहातून जामिनावर कारागृहातून सुटका झाल्यानंतर त्याने पुन्हा देहव्यापाराशी संबंधित एजंट म्हणून काम सुरू केले. दरम्यान, बाबू भाईचा माग काढण्यासाठी पोलिसांची विशेष पथके पश्चिम बंगाल आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये पाठवण्यात आली होती. तरीही तो पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्याच्या नातेवाइकांकडे आणि मित्रमंडळींकडेही चौकशी करण्यात आली. त्याने सर्व संपर्क साधणे बंद केल्याने माग लागणे कठीण झाले आहे. खाकी आणि खादीशी ‘बाबू’ परिचित बाबू भाईच्या तिन्ही बायका बुधवार पेठेत असून, त्या पीडित महिलांना धमकावून वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडत होत्या. तसेच त्यांना कुंटणखान्यातून बाहेर पडून देत नव्हत्या अशी माहिती पोलिसांनी दिली . बाबू भाईचे सुमारे २० वर्षांपासून बुधवार पेठेत वास्तव्य आहे. खादी आणि खाकी दोन्हीशी त्याचे चांगले संबंध होते. नोकरी आणि विवाहाच्या आमिषाने ते बांग्लादेशातून मुली आणत होता. मागील २० वर्षे त्याचे बुधवार पेठेत चांगलेच प्रस्थ होते. “तपासादरम्यान बाबू भाईने बांग्लादेशातील एजंटांच्या मदतीने किमान नऊ महिलांना पुण्यात आणल्याचे स्पष्ट झाले आहे. सुटका करण्यात आलेल्या महिलांचे जबाब नोंदवण्यात आले असून त्यांनी बाबूचे नाव घेतले आहे.” – प्रशांत भस्मे, वरिष्ठ निरीक्षक, फरासखाना, पुणे