अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू; महिला सुरक्षेसह विरोधक सत्ताधाऱ्यांना ‘या’ मुद्दयांवरून घेरणार

Maharashtra Budget Session 2025 | राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज 3 मार्चपासून सुरुवात होणार आहे. तर 10 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारचा पहिलाच अर्थसंकल्प या अधिवेशनात मांडला जाणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांकडून विविध मुद्यांवरून सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
दरम्यान, अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक होणार आहे. सकाळी 10 वाजता विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक होईल. सकाळी 10.30 वाजता विधिमंडळ पायरीवर विरोधक आंदोलन करण्याची शक्यता आहे. तर 11 वाजता विधानसभा कामकाज सुरू होईल.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण, स्वारगेट डेपो शिवशाही बसमध्ये बलात्कार प्रकरण, शेतकरी कर्जमाफी, धारावी जमीन, लाडक्या बहिणींना २१०० कधीपासून मिळणार, शक्ती कायदा, सोयाबीन आणि कापूस खरेदी, कृषी खात्यातील घोटाळ्याच्या आरोपावरून अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप, माणिकराव कोकाटे, राज्यातील महिला असुरक्षित आहेत का? यासारखे मुद्दे आज उपस्थित केले जाण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे, विरोधकांनी काल चहापान कार्यक्रमावर बहिष्कार टाकत आक्रमक पवित्रा घेतला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील तीनही पक्षांतील नेत्यांची बैठक विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या अजिंक्यतारा बंगल्यावर पार पडली. यावेळी आमदार भास्कर जाधव, आमदार भाई जगताप, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार सुनील प्रभू, आमदार आदित्य ठाकरे आणि महाविकास आघाडीतील अन्य नेते उपस्थित होते.
अधिवेशनात महिलांच्या सुरक्षेपासून शेतकरी कर्जमाफीपर्यंत विविध मुद्द्यांवर चर्चा होईल. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी सर्व प्रश्नांना उत्तरे देण्याची तयारी असल्याचे सांगितले आहे. तसेच राज्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जातील, असे आश्वासन दिले आहे. Maharashtra Budget Session 2025 |
या मुद्द्यांवर घेरणार
स्वारगेट अत्याचार प्रकरणामुळे महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. महिला अत्याचाराला आळा घालण्यासाठी आघाडी सरकारने शक्ती विधेयक संमत करून मंजुरीसाठी केंद्र सरकारला पाठवले होते, मात्र ते केंद्र सरकारने परत पाठविल्यावरून विरोधी पक्षाकडून अधिवेशनात सरकारला जाब विचारला जाईल, असे दानवे, आव्हाड, जाधव, जगताप यांनी सांगितले.
माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाने दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. तर भाजपचे आमदार सुरेश धस यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि कृषी खात्यातील घोटाळे उघड केले आहेत. मात्र मुंडे आणि कोकाटेंचा राजीनामा घेतलेला नाही. त्यामुळे हे दोन्ही मंत्री विरोधकांचे लक्ष्य राहतील, असे संकेत मविआच्या नेत्यांनी दिले. त्यामुळे विरोधकांना उत्तर देण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून काय प्लॅनिंग केलं जाणार, याकडे लक्ष लागले आहे.
हेही वाचा:





