Budget 2025 : केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रला काय मिळाले? जाणून घ्या

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत अर्थसंकल्प (Budget 2025) सादर केला आहे. या अर्थसंकल्पातून सर्वसामान्य लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात मध्यमवर्ग, नोकरदारांना दिलासा दिला आहे.
यामध्ये अर्थमंत्री सीतारामन यांनी बारा लाख रूपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच शेतकरी, महिला आणि आरोग्यासाठी देखील मोठ्या घोषणा केल्या आहेत.आजच्या अर्थसंकल्पात शेती, आरोग्य, रोजगार, लघू आणि मध्यम उद्योग, निर्यात, गुंतवणूक, ऊर्जा, नागरिकरण, खाणकाम, अर्थ, कर या क्षेत्रांना प्राधान्य देण्यात आले आहे.
केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला काय मिळाले?
केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला एमयुटीपी-3 प्रकल्पासाठी 1465 कोटी 33 लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. पुणे मेट्रोसाठी 837 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मुळा मुठा नदी संवर्धनासाठी जायकांतर्गत 230 कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वेच्या चार प्रकल्पांसाठी 4 हजार 3 कोटी, मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे – प्रशिक्षण संस्थेसाठी 126 कोटी 60 लाख, मुंबई मेट्रोसाठी 1673 कोटी 41 लाख, महाराष्ट्र ग्रामीण दळणवळण सुधारणांसाठी 683 कोटी 51 लाख, महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क-मॅग्नेट प्रकल्पासाठी 596 कोटी 57 लाख, ऊर्जा संवर्धन व लिफ्ट इरिगेशन प्रकल्पासाठी 186 कोटी 44 लाख, इंटीग्रेटेड ग्रीन अर्बन मोबिलिटी प्रकल्प मुंबईसाठी 652 कोटी 52 लाख, सर्वसमावेशक विकासासाठी आर्थिक क्लस्टर जोडणी कामांसाठी 1094 कोटी 58 लाख रुपयांचा निधी महाराष्ट्राला मिळाला.





