BSNL Cable Theft : क्रेन लावून ड्रेनेजमधून ३४ लाखांची केबल चोरी; हायटेक टोळीचा ‘असा’ झाला पर्दाफाश
BSNL Cable Theft : महापालिकेचे काम सुरू असल्याचे भासवून क्रेन आणि आयशर ट्रॅक्टरच्या सहाय्याने ड्रेनेजमधील केबलवर डल्ला; ९ जणांना अटक केली आहे.

BSNL Cable Theft – महापालिकेचे काम सुरू असल्याचे भासवत क्रेनच्या सहाय्याने ड्रेनेजमधून बीएसएनएलची जुनी तब्बल ३४ लाखांची कॉपर केबल चोरणाऱ्या नऊ जणांना वानवडी पोलिसांनी अटक केली आहे. तर, त्यांच्या पाच साथीदारांचा शोध सुरू आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार अर्शद रफिक सय्यद यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अस्लम सगीर खान (रा. तिलकनगर, दिल्ली), आरिफ बुंदुखान खान (रा. सरावा, बुलंदशहर, उत्तरप्रदेश),
शाहेब हारुण खान (रा. लोणी बहटा, गाजियाबाद), सलमान इद्रीस मलिक (रा. दिल्ली), नरेश कुमार श्रीशिवचरण (रा. बवानीखेडा, हरियाणा), नवी मोहम्मद शान मोहम्मद (रा. दादुपुर, उत्तरप्रदेश), अनिस अन्सारी, मोहम्मद गियासुद्दीन, अफाक अन्सारी, रफिक अन्सारी (सर्व रा. योगापट्टी, बिहार) तसेच प्रवीण दादासाहेब बागुल (रा. शिंदेवस्ती, हडपसर) यांना अटक करण्यात आली आहे.
हडपसर इंडस्ट्रियल एरिया जवळील हनीवेल कंपनीसमोर १० ते १२ जण ड्रेनेजचे झाकण काढून त्यातील बीएसएनएलची कॉपर केबल क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढत होते, त्यानंतर ही केबल आयशर ट्रक्टरमध्ये टाकली जात होती. याबाबतची माहिती वानवडी पोलिसांना मिळाली. यानंतर घटनास्थळी पोलीस पोहोचले असता आरोपींना केबल काढण्याबाबत परवानगी आहे का,
तसेच हे काम अधिकृत आहे का, याची विचारणा करण्यात आली. पोलिसी खाक्या दाखवताच आरोपी अस्लम खान याने सांगितले की, आठ दिवसांपूर्वी ते पुण्यात आले, हनीवेल कंपनीसमोरील ड्रेनेजमधील केबल काढण्याचा त्यांनी प्लॅन बनवला. या कामात त्यांना अनिल देडे आणि प्रविण बागुल यांनी मदत केली, त्यासाठी ३ लाख रुपये घेतल्याचेही समोर आले.
वानवडी पोलिसांनी शनिवारी (दि. ९) रात्री बीएसएनएलच्या मालकीची ३४ लाख ८० हजार रुपये किंमतीची २,९०० किलो कॉपर वायर चोरी करताना आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून केबल, क्रेन, आयशर ट्रक्टर, दोन दुचाकी असा एकूण ८० लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेख करत आहेत.




